नाशिक: दरवर्षी देशातील दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन देवून त्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (१७ सप्टें.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करतांना महात्मा गांधी रोडवर रस्त्यावर चूल मांडून पाव-वडे तळले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर युवक काँग्रेसचे प्रभारी डॉ. निलेश अंबिवडेकर व जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमून रस्त्यावरच भर पावसात चुल मांडली व कढई, तेल टाकून पाववडे तळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे अमिष दाखविले ते पुर्ण केले नाही, उलट बेरोजगार युवकांना पकोडे तळण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे बेरोजगार युवकांच्या प्रतिनिधीत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.