नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापुर्वी केलेल्या नोटबंदीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या दुष्परिणामांचे फलक फडकविले. प्रदेश कॉँग्रेसने नोटबंदीच्या दुस-या वर्षपुर्तीनंतर ९ नोव्हेंबर रोजीच आंदोलनाची हाक दिली असली तरी, भाऊबीज असल्यामुळे आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. दुपारी जिल्हाधिकाºयांना कॉँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले, त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करतांना देशाची आर्थिक स्थिती, भ्रष्टाचार, आतंकवाद संपेल अशा वल्गना केली होती प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती नाजूक झाली असून भ्रष्टाचार, आतंकवाद यामध्ये फरक पडलेला नाही. देशामध्ये १००पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. गरिबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दोन वर्ष उलटूनही जनतेस अजूनही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. नोटबंदी ही देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असून त्याची चौकशी करून नोटबंदी दरम्यान देशामध्ये नागरिकांचा बळी गेला आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.या आंदोलनात शहराध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, हनीफ बशीर, ज्युली डिसुझा, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, निलेश बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलग, पोपट हगवणे, लक्ष्मण जायभावे, राजेंद्र बागुल, गोपाल जगताप, अरुना आहेर, वंदना पाटील, इसाक कुरेशी, समीना पठाण, राजकुमार जेफ, फारुख कुरेशी, जयेश पोकळे आदी उपस्थित होते.
नोटबंदीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे
By श्याम बागुल | Published: November 12, 2018 4:12 PM