नाशिक : नोटाबंदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला एक वर्ष पुर्ण झाल्याने या निर्णयामुळे देशाचे झालेले नुकसान व झालेली जिवीत हानी पाहता सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले तसेच सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून तिचे दहन करण्यात आले.कॉंग्रेस पक्षाने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे जाहीर केल्याने त्यानुसार करण्यात आलेल्या या आंदोलनात कॉँग्रेसचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. सकाळी दहा वाजेपासून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टिका करण्यात आली तसेच जोरदार घोषणाही देण्यात आल्या. यावेळी नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचा जाब विचारणारी प्रश्नावलीचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले. त्यात प्रामुख्याने नोटाबंदीमुळे झालेल्या दिडशे मृत्युला जबाबदार कोण, नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅँकेने १३५ नियम बदलले व त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने त्याला जबाबदार कोण, ३ कोटी ७२ लाख लोकांचा रोजगार बुडाल्यास त्यास जबाबदार कोण, गृहीणींची आयुष्यभराची बचत वाया गेली त्याला जबाबदार कोण असे सवाल करण्यात आले. दुपारनंतर जिल्हाधिकाºयांना पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात येवून केंद्र सरकार आपल्या चुका जो पर्यंत दुरूस्त करीत नाही तो पर्यंत कॉँग्रेस स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात आमदार डॉ. सुधीर तांबे, निर्मला गावीत, डॉ. शोभा बच्छाव, नयना गावीत, शरद आहेर, शाहू खैरे, संजीव तुपसाखरे, डॉ. ममता पाटील, डॉ. हेमलता पाटील, राजू टर्ले, वत्सला खैरे, राहूल दिवे, हनिफ बशीर, वसंत ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कॉँग्रेसचे धरणे, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 7:22 PM