सटाणा : बागलाणमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची चलती असताना कॉँग्रेसला नेहमीच दगा फटका देत आपल्या उमेदवाराला पाडण्याचे राजकारण केले. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पक्षाशी आघाडी न करता त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी आक्र मक भूमिका घेत उपस्थित कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘एकला चलोरे’ चा नारा दिला. कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडीची बिघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी शहरातील सूर्या लॉन्सवर कॉंग्रेसच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांसह इच्छुकांची बैठक झाली . बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती बरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आघाडी करावी की नाही याबाबतही पक्षनिरीक्षक तथा धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी मते जाणून घेतली. उपस्थितांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्यांच्या नेत्यांवर चांगलेच तोंड सुख घेत एकला चलो चा नारा दिला. पक्षाचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे नाव न घेता सडकून टीका केली. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीचा निकाल पाहता भाजप नंतर कॉँग्रेस दुसऱ्या क्र मांकाचा पक्ष आहे. पक्ष वाढवायचा असेल तर स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हापरिषद निवडणुकीचे सहप्रभारी प्रा. जी.के.कापडणीस यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी या निवडणुकीत पक्षातील जेष्ठ लोकांनी थांबून तरु णांना पुढे करण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा.अनिल पाटील यांनी पक्ष श्रेष्ठींनी बैठकीतील कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून आघाडीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली. पंचायत समिती सदस्य परशुराम अहीरे , वामनराव धिवरे ,धनसिंग दातरे , नारायण खैरनार , गौतम वानखेडे आदी पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली. तर विजय पाटील ,माजी शिक्षण सभापती यशवंत पाटील , जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत अहीरे यांनी मात्र एक पाउल मागे घेत जागा वाटप योग्य पद्धतीने होऊन आपल्या विचाराच्या पक्षाबरोबर आघाडी केल्यास हिताचे राहील असा सल्ला वजा भूमिका मांडली. बैठकीच्या प्रारंभी तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांनी प्रस्ताविक करून जिल्हा परिषदेसाठी एकवीस तर चौदा गणांसाठी चाळीस इच्छुकांचे मनोगत जाणून घेत पक्षाचे अर्ज भरून घेतले.बैठकीत राष्ट्रवादीचे सदस्य अवतरले बैठक सुरु असताना अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हापरिषदेच्या जायखेडा गटाचे सदस्य यतीन पगार हे अचानक अवतरले यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या . त्यांचे कॉंग्रेसचे पक्षनिरीक्षक शाम सनेर यांनी कॉंग्रेसचा पटका त्यांच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्याचा स्वीकार न करता साधी शाल घेणे पसंत केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पगार यांना थेट जायखेडा गटासाठी उमेदवारीची आॅफर दिली. मात्र त्यांनी आभार व्यक्त करत कॉंग्रेसला आघाडीची आॅफर दिली. दरम्यान पक्षिनरीक्षक सनेर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत खरे तर दोन्ही पक्षांची परिस्थिती चांगली आहे. सत्ता स्थापण्यासाठी आघाडीची गरज आहे .मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांची मानसिकता नसली तरी आघाडी बाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा असे सांगून आघाडीचा चेंडू प्रेदेशाध्याक्षांच्या कोर्टात टाकला.
कॉँग्रेसचा ‘एकला चलोरे’चा नारा
By admin | Published: January 16, 2017 1:11 AM