नाशिक : भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाल्याच्या निषेधार्थ कॉग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय उपवास आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सरकारचे आपल्या चुका दुरूस्त कराव्या अन्यथा तो पर्यंत पक्ष स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशपातळीवर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप व रास्वसंघामार्फत चालले असून, त्यामुळे सामाजिक सलोखा व शांततेला धोका पोहोचत आहे. महाराष्टÑातील दंगलीत मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांचा सहभाग उघड होवून सरकारने त्यांच्या विरोधात कोणतेही पावले उचलली नाहीत असा आरोपही यावेळी करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून, आंतरराष्टÑीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोजा टाकून महागाई वाढवत आहे. इंधनाची दरवाढ करून नीरव मोदी, विजय माल्ल्याने बॅँकांच्या बुडविलेल्या हजारो कोटी रूपयांची वसुली सर्वसामान्यांकडून केली जात आहे. इंधन दरवाढीतून सामान्यांची लूट केली जात असून, राज्य सरकारने डिझेलवर विविध कर आणि सेस लावले अहेत. त्यामुळे गोवा, कर्नाटक या शेजारील राज्यांपेक्षा महाराष्टÑात इंधनाचे दर अधिक आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून तात्काळ इंधनाच्या किंमती कमी करण्याची मागणही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार निर्मला गावीत, डॉ. सुधीर तांबे, साक्रीचे आमदार धनाजी अहिरे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, नानासाहेब बोरस्ते, वत्सला खैरे, अश्विनी बोरस्ते, आशा तडवी, आर. आर. पाटील, विमल पाटील, रईस शेख, राजेंद्र मोगल, शैलेश कुटे, यशवंत पाटील, बळवंत गोडसे, राजेेंद्र मोगल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.