संजय दुनबळे। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महिलांना ५० टक्के आरक्षणाच्या नियमानुसार एकूण ८४ सदस्य असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत ४२ महिला सदस्य निवडून आल्या असून, त्यातही भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉँग्रेसच्या २८ सदस्यांपैकी तब्बल १४ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे विजयी महिलांमध्ये सर्वात कमी मते घेऊन विजयश्री प्राप्त करणारी महिलाही कॉँग्रेसचीच आहे. मालेगाव महानगरपालिकेची चौथी पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे ४२ महिलांनी या निवडणुकीच्या माध्यमातून मालेगाव महापालिकेत प्रवेश केला आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी महिलांनी उमेदवारी दिली. त्यापैकी भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या सर्वाधिक (१४) महिलांना विजय मिळाला आहे. कॉँग्रेसशिवाय इतर कोणत्याही राजकीय पक्षांना विजयी महिला उमेदवारांची दुहेरी संख्या गाठता आली नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी ९, तर जनता दल आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येकी तीन महिलांनी विजय मिळविला आहे. मालेगाव महानगरपालिकेत नव्यानेच प्रवेश करणाऱ्या एमआयएम या पक्षाच्या पहिल्याच प्रयत्नात चार महिला विजयी झाल्या आहेत. सर्वाधिक मते मिळवून विजयी होण्याचा मान राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रभाग १५ मधील उमेदवार सबीहा मुजम्मील बफाती (९३८३) यांनी मिळविला आहे. विजयी होणाऱ्या महिलांमध्ये सर्वात कमी मते मिळवून विजयी होण्याचा विक्रम भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या प्रभाग २ मधील उमेदवार हमीदा शेख जब्बार (२२४२) यांच्या नावे नोंदला गेला आहे. याच प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार छाया दीपक शिंदे यांना २९४८ इतकी मते मिळालेली आहेत. महापालिकेत सर्वात कमी जागा जनता दलाला (६) मिळाल्या आहेत. या पक्षाच्या निवडून आलेल्या ६ उमेदवारांमध्ये ३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या पक्षाच्या प्रभाग १५ मधील उमेदवार शान-ए-हिंद निहाल अहमद (९०९५) यांना विजयी महिला उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. महापालिकेच्या कारभारात सुधारणा करून आपल्या प्रभागात अधिकाधिक विकासकामे करण्याबरोबरच संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी निवडून आलेल्या महिला पार पाडतील, अशी सर्वसामान्य मालेगावकरांची अपेक्षा आहे.
कॉँग्रेसच्या सर्वाधिक महिला सदस्य
By admin | Published: May 27, 2017 11:50 PM