कॉँग्रेसच्या ऊर्जितावस्थेची सुचिन्हे...
By किरण अग्रवाल | Published: September 16, 2018 01:59 AM2018-09-16T01:59:31+5:302018-09-16T01:59:39+5:30
स्थानिक पातळीवरील निर्नायकी अवस्था व सत्तेअभावी कार्यकर्तेही ओसरल्याने काँग्रेसची अवस्था खिळखिळीच झाली होती; परंतु माजी मुख्यमंत्र्यांचे दौरे व त्यात अभिजनांशी संवाद-संपर्काने पक्ष कार्यकर्त्यांचेही मनोबल उंचावले आहे. पक्षीय पातळीवरील सक्रियता त्यामुळेच वाढून गेली आहे
सारांश
स्थानिक पातळीवरील निर्नायकी अवस्था व सत्तेअभावी कार्यकर्तेही ओसरल्याने काँग्रेसची अवस्था खिळखिळीच झाली होती; परंतु माजी मुख्यमंत्र्यांचे दौरे व त्यात अभिजनांशी संवाद-संपर्काने पक्ष कार्यकर्त्यांचेही मनोबल उंचावले
आहे. पक्षीय पातळीवरील सक्रियता त्यामुळेच वाढून गेली आहे
गेल्या लोकसभा व त्यापाठोपाठ झालेल्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने काहीशी मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये सक्रियता वाढीस लागल्याचे चित्र आहे. विशेषत: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे तर ही ऊर्जितावस्था आली आहेच; परंतु युवक काँग्रेसच्या निवडणुकीमुळेही त्यास हातभार लागून गेला आहे. कारण, विद्यमान अवस्थेत विरोधकांची भूमिका या पक्षाकडे असतानाही पक्षांतर्गत निवडणुकीनिमित्ताने मोठ्या प्रमाणात सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे अवसान गळालेल्या स्थितीतही
‘अच्छे दिन’ची अपेक्षा बळावून जाणे स्वाभाविक म्हणायला हवे.
पराभवामुळे तर काँग्रेसमध्ये हबकलेपण आले होतेच; परंतु स्थानिक पातळीवरील निर्नायकी अवस्थेमुळेही ते अधोरेखित होऊन गेलेले होते. मध्यंतरी तर शहराध्यक्ष नेमणुकीबाबतची मतभिन्नता इतकी टोकाला गेली होती की नाशकात समांतर काँग्रेसचे प्रयोगही काहींनी करून पाहिले. परंतु संबंधिताना फार पाठिंबा मिळू शकला नाही. एकूणच व्यक्ती वा नेते तितके गट, अशा स्थितीत पक्षाची वाटचाल सुरू होती. सत्ता नसल्याने नेते परागंदा झाले होते तसे कार्यकर्तेही ओसरले होते. त्यामुळे प्रश्न अगर विषय अनेक असतानाही लोकआंदोलने केली गेली नाहीत. जयंत्या-पुण्यतिथीच्या कार्यक्रमांपुरतीच काँग्रेसची उपक्रमशीलता दिसून येत होती. परंतु देश पातळीवरील सत्ताधाºयांच्या ‘अच्छे दिन’चे वातावरण बदलू लागले तसे काँग्रेसमध्ये चेतना जागलेली दिसून आली. नाशकातही मरगळलेल्या पक्षात जान आली, ती माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या सध्य आर्थिक स्थितीवरील या विवेचनाच्या कार्यक्रमामुळे. अशोक चव्हाण, खासदार कुमार केतकर व निवृत्त न्यायमूर्ती अभय ढिपसे यांचाही सहभाग असलेल्या या कार्यक्रमास नाशकातील सर्व क्षेत्रीय मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या प्रतिसादाने स्थानिक नेत्यांचा आत्मविश्वास वाढला, आणि तेथून खºया अर्थाने सक्रियतेला चालना मिळाली.
काँग्रेसच्या सत्ताकाळात संधी लाभलेले अनेक मान्यवर नाशकात व जिल्ह्यातही आहेत; परंतु एक तर ते स्वत: पक्ष कार्यात सहभागी होईनासे झाले आहेत, किंवा पक्षाने त्यांंना अडगळीत ढकलल्यासारखे झाले आहे. वरिष्ठ नेते आले की, तेव्हाच अशांचे मुखदर्शन होते. म्हणजे त्यांच्या ज्येष्ठतेचा, अनुभवाचा म्हणून जो लाभ नवोदितांना व्हायला हवा तो होत नाही किंवा घेतलाही जात नाही. त्यामुळे कमालीचे सुस्तावलेपण ओढवले होते. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाशिक दौरे व कार्यक्रम वाढल्याने ही मरगळ झटकली जाण्यास संधी मिळून गेली आहे. विशेष म्हणजे, केवळ पक्षीय कार्यक्रमात न अडकता त्यांनी वेगवेगळ्या संस्थांचे कार्यक्रम स्वीकारून त्या व्यासपीठांवरून सत्ताधाºयांच्या घोषणाबाजीचा यथेच्छ समाचार घेतला. राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहाराची शंका त्यांनी मुद्देसूदपणे पटवून देतानाच उद्योग, शेती, सहकार, रोजगार आदी सर्वच क्षेत्रातील वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत याला ‘अच्छे दिन’ म्हणायचे का, असा प्रश्न उपस्थितांवरच सोपविला. त्यांच्या उपस्थितीमुळे इंधन दरवाढीच्या निषेधाचा मोर्चाही चांगलाच झाला. त्यात शहराऐवजी ग्रामीणच्याच कार्यकर्त्यांची शक्ती अधिक दिसली हा भाग वेगळा, पण काँग्रेस सक्रिय झाल्याचे त्यातून अधोरेखित झाले.
महत्त्वाचे म्हणजे, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौºयांमुळे स्थानिक पातळीवरील निस्तेजावस्था दूर होण्यास मदत घडून येत आहेच; परंतु दरम्यानच्या काळात युवक काँग्रेसची निवडणूक झाल्याने जिल्ह्यात सुमारे दहा हजाराच्या जवळपास क्रियाशील कार्यकर्ते नोंदविले गेलेत. बरे घरी बसून संबंधितांनी बोगस नावे, पत्ते व पैसे भरून ही नोंदणी करून घेतली असे नाही, तर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी यासाठीचे सॉफ्टवेअरच असे काही तयार केले आहे की, त्यात बोगसगिरीला वावच राहिला नाही. तेव्हा पक्षाच्या अडचणीच्या काळात इतक्या मोठ्या संख्येने ही नोंदणी व्हावी हेदेखील काळाच्या बदलत्या पावलांची चाहूल देणारे ठरावे. ‘देश बदल रहा है’चा प्रत्यय यातून अनुभवता यावा. लोकमानसाची बदलती मानसिकता स्वत:बाबत अनुकूल करून घेण्यासाठी काँग्रेस ही सक्रियता कितपत टिकवून ठेवते हेच आता बघायचे.