नाशिक : कोविडविरुद्धच्या लढाईत उतरलेल्या यंत्रणेत महावितरणदेखील अत्यावश्यक सेवा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प, कोविडसाठी विशेष वीजभाराला चोवीस तासात मंजुरी देण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य तसेच पोलीस यंत्रणेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या या संकट काळात महावितरणची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि त्या आधीही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी महावितरणवर असल्याने यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत प्रामुख्याने घरूनच काम सुरू असल्याने घरगुतीसह कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफिलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहे.
कारोनाचा प्रसार झपाट्यान होत असतांना जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स तसेच हॉस्पिटल उभारणी सुरू झाली. ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाले तर काहींची क्षमता वाढविण्यात आली. यासाठी महावितरणची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरली. अवघ्या चोवीस तासाच म्हणजे एकाच दिवसात वाढीव वीजभाराबरोबरच वीज जोडणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची कामगिरी महावितरणने पार पाडली.
जिल्ह्यात एक ऑक्सिजन प्रकल्प, एक कोविड सेंटर तसेच कोविड हॉस्पिटल्ससाठी महावितरणने वीज जोडणीचा अर्ज दाखल झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात प्रक्रिया पूर्ण करून कोरोनाच्या लढाईतील तत्परता दाखविली. जिल्ह्यात एकूण ३६० किलोवॅटचा वाढीव वीजभार मंजूर करून देण्यात आला तसेच तत्काळ वीज जोडणी देखील देण्यात आली. सिन्नर, पिंपळगाव बसवंत तसेच दिंडोरी या ठिकाणी महावितरणने अवघ्या एका दिवसात वाढीव भार मंजूर केला.
कोरोनाच्या कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्यासाठी जनमित्र तसेच ऑफीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोराेनासाठी लागणारा वाढीव वीजभार आणि जोडणी प्राधान्याने देण्याची भूमिका महावितरणकडून घेण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सध्या राज्यात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेली वीजसेवा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर कर्तव्य बजावत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालये, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन निर्मिती उद्योग व लसीकरण केद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार बाजूला ठेवून कामे करण्यात येत आहे.
--इन्फो--
राज्यातही तत्पर सेवा
राज्यात सद्य:स्थितीत अतिरिक्त १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह ३९ कोविड रुग्णालयांना २४ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.