लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी उत्पादने खासगी क्षेत्राकडून निर्माण करण्याचे ठरविल्याने नाशिक येथे संरक्षण उत्पादन निर्मिती केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारशी राज्य सरकारचे यासंदर्भात बोलणे सुरू असून, नाशिक हे सर्वार्थाने योग्य असे ठिकाण आहे. खासगी उद्योजकांनी या ठिकाणी निर्मिती सुरू केल्यास त्यासाठी जागा, पाणी, वीज व रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येईल. गेल्या वर्षी नाशिक दौऱ्यावर आलेल्या सुभाष देसाई यांनी एका वर्षात नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणुकीत वाढ करण्याची घोषणा केली होती, त्याची आठवण करून दिल्यावर त्यांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने आपल्या प्रकल्पाचा विस्तार केला तर जिंदाल कंपनीदेखील नवीन प्रकल्प सुरू करत असल्याचे सांगून, जागतिक मंदी व नोटाबंदीमुळे काही प्रमाणात उद्योग वाढीचा विस्तार मंदावल्याचे कबूल केले. मात्र येणाऱ्या काळात त्यात निश्चितच वाढ झालेली असेल. येत्या ३० व ३१ मे रोजी मुंबईत होणाऱ्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमात उद्योजकांना अधिकाधिक सहभागी करून घेण्यात येणार असून, त्यातून गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड ताब्यात घेणारऔद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ताब्यात घेत असल्याचे देसाई यांनी मान्य केले. ज्यांनी उद्योगासाठी जमिनी घेतल्या व यंत्रसामग्री ठेवून नंतर त्यावर कर्ज प्रकरणे केली, उद्योग मात्र सुरू झालेले नाहीत अशा जागा ताब्यात घेण्यात काही अडथळे आहेत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहितीही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
नाशकात संरक्षण उत्पादन निर्मिती केंद्र
By admin | Published: May 18, 2017 12:46 AM