नाशिक : पुणे येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेल्या भद्रकाली परिसरातील श्री भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्टमार्फत १९९६ साली ‘श्रीमंत साक्षी गणेश गणपती मंदिरा’ची काशी येथील रामा नरेशाचार्य आणि गणेशबाबा यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत साक्षी गणेश हा मानाचा चौथा गणपती असून, या मंडळातर्फे पहिल्यांदाच नाशिकमध्ये ‘माघी गणेश उत्सव’ सुरू करण्याची परंपरा सुरू करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र काटे यांनी दिली. कुठल्याही स्वरूपातील वर्गणी न स्वीकारता टस्ट्रतर्फे माघी गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माघी गणेशोत्सवात गणेश यागासह वर्षभरातील विविध उत्सव पारंपरिक पद्धतीने ट्रस्टतर्फे साजरे करण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्टतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवदेखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून, ‘शनिवार वाडा’, ‘पेशवाई मंडप’ यांसारखे आकर्षक देखावे तयार करत उत्कृष्ट देखाव्यांची अनेक पारितोषिकेही या ट्रस्टने पटकावली आहेत. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी काढण्यात येते.पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत तात्यासाहेब गोडसे यांच्या पुढाकाराने श्रीमंत साक्षी गणेश गणपती दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारणे शक्य झाल्याचेही मंडळातर्फे आवर्जुन सांगण्यात आले. मूर्तिकार पद्माकर सोनवणी यांनी २५० किलो सोनं- पितळ यापासून ही मूर्ती घडवली असून, मंदिरात दररोज त्रिकाल पूजा करण्यात येते. अनेक भक्तांकडून गणपतीला नवसाचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. तसेच गणेशभक्त अनंतराव काटे (धुळे) यांनी सव्वा किलो चांदीचे कान, जुने नाशिक भागांतील दिवंगत विधाते मावशी यांनी पाच पदरी चांदीचा हार, प्रकाशशेठ शर्मा यांनी तीन किलो चांदीचा उंदिर, व्यावसायिक अग्रवाल यांनी दिलेल्या पाच किलो चांदीपासून गणपतीची शस्त्र तसेच हातातील कडे बनविली आहेत. तसेच तत्कालीन नगरसेवक विनायक पांडे यांनी ५१ किलो वजनाचा आणि दीड फूट उंचीचा पितळाचा उंदीर ट्रस्टला भेट दिला आहे. श्री भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्टच्या कार्यकारिणीवर राजेंद्र काटे (अध्यक्ष), संजय रत्नपारखी (उपाध्यक्ष), माधव निमकर (सचिव), दिलीप कहाणे (खजिनदार) यांच्यासह राजेंद्र बागुल, सुनील शिंदे, सतीश मोरे, विराज काटे, सौरभ शिंदे आदि सदस्य काम बघतात.विविध सामाजिक उपक्रमभद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट यांच्याकडून गणेशोत्सवाखेरीज वर्षभर विविध सामाजिक उपक्रमदेखील राबविण्यात येतात. यामध्ये अन्नदान, शैक्षणिक साहित्याचे वाटप आदि उपक्रमांचा समावेश आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना तसेच वेश्या वस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी ट्रस्टतर्फे आगामी काळात शाळा सुरू करण्याचा मानस आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या छातीत गणेश यंत्र सिद्ध करण्यात आले असून, भक्तांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होत असल्याचे तसेच काशीचे रामा नरेशाचार्य यांनी या गणपतीच्या दर्शनाने नाशिकचा कुंभमेळा दर्शन पूर्ण होत असल्याची धर्माज्ञा केली असल्याचेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
सामाजिक सेवेचा जपला अनोखा वसा-वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:43 AM