पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१७ साली घडलेल्या एका लुटीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित अविनाश कौलकर यास अटक केली होती. चौकशीत त्याने २०१५ साली उगलमुगले याचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त, उपायुक्तांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोधपथकाकडे दिला होता. कौलकरच्या जबाबावरून पोलिसांनी उगलमुगले खुनाचा गुन्हा उघडकीस आणून, तत्कालीन सहाय्यक उपनिरीक्षक अशोक सरोदे यांच्या फिर्यादीवरून संशयित हेमंत दिनेश शेट्टी, राकेश तुकाराम कोष्टी, कुंदन सुरेश परदेशी, श्याम लक्ष्मण महाजन, रोहित विलास कडाळे, कौलकर, राहुल गोतेशी, व गोपाळ गोसावी या संशयितांविरुध्द खून, खुनाचा पुराव नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दाेन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत सबळ पुराव्यांअभावी संशयितांची निर्दोष मुक्तता केली.
--इन्फो--
परिस्थितीजन्य पुरावे देण्यास अपयश
खून खटल्याची नियमित सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाने यावेळी ४० साक्षीदार तपासले. सरकार पक्षाकडून गुन्ह्याचा कट, खून, पुरावा नष्ट करण्याचा झालेल्या प्रयत्नांबाबतचे पुरावे सादर केले. मात्र, त्यास संशयितांच्या वकिलांनी हरकत घेत परिस्थितीजन्य पुरावे नसल्याचे न्यायालयात सांगितले. यामुळे या पुराव्यांवरून संशयित शेट्टींसह अन्य आठ संशयितांचा या गुन्ह्यात सहभाग सिध्द होत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.