नाशिक : १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नसल्याचा निर्णय गुरुवारी (दि.१४) जाहीर केला होता; मात्र हा निर्णय नागरिकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बदलला आहे. नागरिकांना पुरेसा कालावधी ‘फास्टॅग’ घेण्यासाठी मिळावा, म्हणून प्राधिकरणाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला.देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गांच्या टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी केवळ एकच लेन ठेवण्याचा निर्णय प्राधिकरणाने बोलून दाखविला होता; मात्र याबाबत दबाव व विरोध वाढल्यानंतर प्राधिकरणाने निर्णय बदलला असून, दि. १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तोपर्यंत फास्टॅग वाहनमालकांनी आपल्या वाहनावर लावणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. येत्या १५ तारखेपर्यंत वाहनचालकांसाठी सर्व लेन खुल्या राहतील. वाहनचालक नेहमीप्रमाणे रोख स्वरूपात टोलचे शुल्क भरू शकणार आहे. १५ डिसेंबरनंतर प्राधिकरणाकडून सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शुल्क वसुली मोहीम राबविण्यासाठी फास्टॅगप्रणालीचा पुरेपूर वापर केला जाऊ शकतो, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी मोटारीच्या पुढील बाजूने चालकाच्या दिशेने विशिष्ट प्रकारचे ‘फास्टॅग स्टिकर’ काचेवर लावणे बंधनकारक आहे. फास्टॅग एखाद्या मोबाइल रिचार्जप्रमाणे कुठल्याही आॅनलाइन पेमेंटच्या माध्यमातून किंवा काही खासगी व राष्ट्रयीकृत बॅँकांमधून रिचार्ज करता येईल, असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. यासाठी सध्या २२ खासगी व राष्ट्रीयकृत बॅँकांमध्ये तसेच प्रत्येक टोलनाक्यांवर आणि आॅनलाइन पेमेंट अॅप्लिकेशनवरदेखील फास्टॅग उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. घोटी टोलनाक्यावर सुमारे दहा हजार, पिंपळगाव टोल नाक्यावर ३५ हजारांपेक्षा अधिक फास्टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहेत....तूर्तास मिळाला दिलासाफास्टॅगबाबत प्राधिकरणाने मुदतवाढ दिल्याने वाहनचालक-मालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील कुठल्याही टोलनाक्यावर कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी प्राधिकरणाचे नाशिकचे व्यवस्था दिलीप पाटील यांच्यासह सर्व टोलनाक्यांवरील व्यवस्थापक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस ठाण्यांचे निरीक्षक यांची संयुक्त बैठक बोलावून एक लेनऐवजी तीन लेन फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याचे आदेशित केले.
तुर्तास दिलासा : 'फास्टॅग'ला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 5:11 PM
फास्टॅग एखाद्या मोबाइल रिचार्जप्रमाणे कुठल्याही आॅनलाइन पेमेंटच्या माध्यमातून किंवा काही खासगी व राष्ट्रयीकृत बॅँकांमधून रिचार्ज करता येईल, असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे‘फास्टॅग स्टिकर’ काचेवर लावणे बंधनकारक आहे१५ तारखेपर्यंत वाहनचालकांसाठी सर्व लेन खुल्या राहतील.