नाशिक : कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी 'वनाधिपती' अशी उपाधी देऊन गौरविलेले राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री (दि.२३) रात्री निधन झाले. देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विनायकदादा यांची जुनी मैत्री होती. पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी दादा एक होते. दादांच्या निधनाने त्यांनाही धक्का बसला. कोरोनाचा प्रार्दुभावमुळे त्यांना अंत्ययात्रेला येता आले नाही. त्यामुळे पवार यांनी बुधवारी (दि.२८) त्यांच्या नाशिकमधील ‘कदंबवन’ निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.
दरम्यान, भुजबळ नॉलेज सिटी येथे हेलिकॉप्टरने शरद पवार त्यांचे सकाळी आगमन झाले. तेथून ते मोटारीने हॉटेल एमराल्डपार्क येथे आले. तेथे चहापान घेतल्यानंतर तेथून तत्काळ अंबड-सातपुर लिंकरोडवरील दादांचे 'कदंबवन' या निवासस्थानी मोटारीने रवाना झाले.कदंबवनात दादांचे बंधु सुरेशबाबा पाटील, दादा यांची कन्या भक्ती पाटील, ज्ञानेश्वरी गरुड, नातू हर्ष गरुड, जावई कुलदीप गरुड आदींची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी दादांच्या प्रतीमेपुढे पुष्पांजली अर्पण करत त्यांनी श्रध्दांजली वाहिली, यावेळी पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थीत होते. यावेळी त्र्यंबकरोड ते पपया नर्सरी पर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती.