त्र्यंबकेश्वर : शहरात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. याचबरोबर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने त्याचाही उपयोग होत असल्याचे चित्र आहे.तीन आठवड्यांपूर्वी त्र्यंबक शहरात दररोज ५० ते ६० कोरोनाबाधित आढळून येत होते.आता ही संख्या शनिवारी (दि. २४) अवघ्या एकावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पोलीसही ॲक्शन मोडवर आले असून विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्र्यंबक पोलिसांचे संख्याबळ अपुरे असतानाही यंत्रणा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. गतवर्षी १५ जून २०२० रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये कोरोनाने शिरकाव केला. तेव्हापासून आजपर्यंत एकूण २२८९ बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी त्र्यंबकेश्वर शहरात ७३६ तर जि.प.च्या ग्रामीण हद्दीत १५५० रुग्णांचा समावेश आहे. यातील १८३८ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत १८ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत शिवप्रसाद कोविड केअर सेंटरमध्ये ४३, अंजनेरी ट्रेकिंग सेंटरमध्ये २३, अंजनेरीच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २२, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५, खासगी हॉस्पिटलमध्ये ४ रुग्ण दाखल गृहविलगीकरणात ४३३ रुग्ण आहेत. दरम्यान, शनिवारी १९१ लोकांचे स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत.
त्र्यंबकेश्वरला दिलासाजनक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 9:01 PM
त्र्यंबकेश्वर : शहरात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. याचबरोबर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने त्याचाही उपयोग होत असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देरुग्णसंख्येत घट : पोलिसांकडून कारवाईचे सत्र