राजन खान : दाभोलकर व्याख्यानमालानाशिक : जात-धर्म सांभाळून माणूस म्हणून जगण्याचा हक्क भारतीय संविधानाकडून देशातील प्रत्येकाला बहाल करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील इतिहासामधील अनेक घटना न जुळणाºया आहेत. संविधान हे गंगा -जमुनी संस्कृतीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन लेखक राजन खान यांनी केले. शहरातील पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेच्या ४४वे पुष्प खान यांनी गुंफले. सार्वजनिक वाचनालयातील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित विवेक व्याख्यानमालेत ‘गंगा-जमुनी संस्कृती’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाने इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून चिकित्सकपणे विचार करण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. १२५ वर्षांमध्ये चुकीचा इतिहास लिहिला गेला. हल्ली इतिहासाचा वापर केवळ एकमेकांच्या कुरघोडी काढण्यासाठी होताना दिसून येत आहे. बंदूक अन् तलवारी म्हणजे विवेकवाद नव्हे तर माणुसकीद्वारे संस्कृतीची जोपासना करत आयुष्य जगणे हा विवेकवाद आहे. भाषेवर कोणत्याही जाती-धर्माचा मक्ता नाही. व्यक्ती राहत असलेल्या परिसरातील बोलीभाषा तो शिकत आलेला असतो भाषा ही नेहमी सामाजिक व सार्वजनिक मालकीची असते हे लक्षात घेणे गरजेचे असते खान म्हणाले.
संविधान गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:45 PM