सिन्नर : शहर व उपनगरातील घरगुती हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन सरदवाडी धरण किंवा अन्य पिण्याच्या पाण्याचा साठा असलेल्या बंधारा किंवा धरणात होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासन व पोलिसांनी कंबर कसली आहे. पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी कृत्रिम कुंडाचीही सोय करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नर शहरालगत असलेल्या सरदवाडी धरणात गणेश मूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये यासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कृती केली जात आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शहरानजीक असलेल्या बंधारे व धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे पाणी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी गणेश मंडळे, पोलीस, महसूल व नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी यांची बैठकही पार पडली. त्यात गणेश विसर्जनाबाबत सूचना करण्यात आल्या. शहरातील गणेशमूर्ती दान स्वीकारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नगर परिषद प्रशासनासोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे.
नगर परिषदेने शहर व परिसरात १४ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. मूर्ती व निर्माल्य स्वीकारण्यासाठी २५ ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषद अधिकारी व कर्मचारी पथक व पोलीस पथक तैनात करण्यात येणार आहे. शहर व उपनगरातील गणेश मूर्ती व निर्माल्य स्वीकारण्यासाठी अजिंक्यतारा हॉटेलजवळ, शिवाजीनगर भागातील गणपती मंदिर, चौदा चौक वाडा, विजयनगर, देवनदी पूल, कुंदेवाडी फाटा, देवी मंदिर रस्ता, सरदवाडी धरणाजवळ या ठिकाणी ट्रॅक्टर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली.
----------------------
कृत्रिम कुंडाची व्यवस्था
दरवर्षी सरदवाडी रस्त्यावरील सिलिव्हर लोटस् शाळेच्या जलतरण तलावात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंडाची निर्मिती करण्यात येते. यावर्षीही संस्थेचे दिलीप बिन्नर यांच्या सहकार्यातून या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंडाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
-----------------------------
त्र्यंबकला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
त्र्यंबकेश्वर : प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथेच नव्हे तर पूर्ण भारतभर मूर्ती तयार केल्या जात असत. पण या मूर्ती पाण्यात विरघळून जात नाहीत, उलट या मूर्तींनी पर्यावरणाचा समतोल बिघडतो. प्रदूषण वाढते. हे जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आले, तेव्हापासून शक्यतो पीओपी मूर्ती विसर्जित करत नाहीत. त्याऐवजी मूर्तींचे दान पालिकेला करावे, अशी संकल्पना अमलात आणली आणि पालिकेला जवळपास दोन ट्रॅक्टर भरून गणपतीच्या मूर्ती दान मिळतात. साधारण एक दिवसाचा गणपती दीड दिवसाचा तीन दिवसांपासून विसर्जनासाठी सुरुवात करतात. नगर परिषदेतर्फे मोठा स्टाॅल लावला जातो. तेथे एक स्नीकर लावतात आणि त्यावरून मूर्ती दान करण्याचे आवाहन केले जाते. याशिवाय पर्यावरण संवर्धनाचे फायदे आणि प्रदूषणाचे तोटे सांगितले जातात. गावात गौतम तलाव बिल्वतीर्थ मुकुंद तलाव व प्रयाग तीर्थ येथे शक्यतो गणेश विसर्जन करतात. याशिवाय अनंत चतुर्दशीच्या अगोदर श्री गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टाकी पालिकेतर्फे आणून तेथे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे गत आठ ते नऊ वर्षांपासून शक्यतो पीओपी मूर्तीचे विसर्जन न करता त्या मूर्ती दालनात स्वीकारतात. त्यामुळे येथे पर्यावरण संवर्धन राखण्यास उपयोग होतो.
------------------------------------
चांदवड नगर परिषदेच्यावतीने मूर्ती संकलन केंद्र
चांदवड : येथील नगर परिषदेच्या वतीने या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार लोकांना एकमेकांशी संपर्क कमीत कमी व्हावा या दृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित कदम, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता सत्यवान गायकवाड यांनी केले. त्यांनी अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चांदवड परिसरात विसर्जनासाठी करण्यात आलेली व्यवस्थेची माहिती दिली. गेल्या वर्षीही नगर परिषदेने मूर्तींचे संकलन केले होते. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर गणेश मंडळांना नगर परिषदेने काही निर्बंध घालून दिले. त्यात मंडप व देखावा पाहण्याकरिता आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग व नियम पाळावेत तर गणेश मंडळांनी सॅनिटायझर तसेच थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करावी, महाप्रसादाचे आयोजन करू नये, गणेश मंडळांनी गणपती मंडळासमोर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, घरगुती गणपती स्थापना केलेल्या सर्वांना विसर्जन करताना कोणत्याही पद्धतीची मिरवणूक काढता येणार नाही. नगर परिषदेने स्थापन केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर आरती करता येणार नाही. सर्व गणेश मंडळांनी परिसरात कृत्रिम विसर्जन तलावाची (छोट्या आकारात) निर्मिती करावी, अन्यथा नगर परिषदेने मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती विसर्जित करावी. चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, होमगार्ड सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
------------------------------------
चांदवड येथील पुरातन रंगारी तलावाच्या सभोवताली गेल्या वर्षी बसवलेल्या संरक्षक जाळ्या. (१६ चांदवड कुंड)
160921\16nsk_13_16092021_13.jpg
१६ चांदवड कुंड