नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीसोबतच बांधाकाम क्षेत्राला पूरक साहित्य स्टील, सिमेंट, विटांचेही दर वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम निर्माणाधीन गृहप्रकल्पांवर परिमाण होत आहे. त्यातच आता बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचा घट असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खडीचेही भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न आणखीनच महाग होणार आहे. तसेच या महागाईचा फटका स्वस्त घरांच्या मोहिमेलाही बसणार आहे.
बिल्डिंग मटेरियलच्या भाववाढीमुळे पुढील काळात घराचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागण्याचे संकेत दिसून येत आहेत. नाशिक जिल्हा स्टोन क्रशर ओनर्स संघटनेने बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या खडीचे वाढीव दर मागील महिन्यातच जाहीर केले होते. स्टोन क्रशर चालकांसमोर निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांना ही दरवाढ करणे अपरिहार्य असले तरी त्याचा थेट परिमाण बांधकाम क्षेत्रावर होऊन घरांच्या व विविध बांधकाम प्रकल्पांवर होऊन त्यांचा निर्मिती खर्च वाढणार असून सामान्य माणसाचे घराचे स्वप्नही महागणार आहे.
इन्फो
रोजंदारीचे दरही सुमारे ३० टक्क्यांनी वाढले
गेल्या काही दिवसांतील दरवाढीमुळे डिझेलचे दर वाढून ९६ रुपयांपर्यंत पोहोचले असून, खडी क्रशरच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे स्टीलचे अँगल, चॅनल, गर्डर, प्लेटा आदी साहित्याचे भाव ४० रुपयांहून ६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे वाढलेले वीज दर, वाहनांचे स्पेअर पार्टस् यासह क्रशरवरील मजुरांचे रोजंदारीचे दरही सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहेत. वाहनांच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून १ जुलैपासून रॉयल्टीचे दरही ४०० रुपयांहून ६०० रुपये झाले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा स्टोन क्रशर ओनर्स संघटनेने खडी, आर्टिफिशिअल सॅण्ड व वॉश सॅण्डचे दर वाढविले आहे.
इन्फो-
प्रतिब्रास खडीचे असे वाढले दर
खडी - जागेवरचा भाव - पोहोच भाव
१०/२० एमएम - २४०० - ३०००
६ एमएम -२७०० -३३००
आर्टिफिशिअल सॅण्ड - ३४०० - ४०००
वॉश सॅण्ड - ४४०० - ५०००
प्लास्टर सॅण्ड - ५४०० - ६०००