लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीची नामांकनाची प्रक्रिया पार पडून नमुना मतपत्रिकांची छपाई झाल्याने आता मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटमध्ये उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह फिड करण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि. अर्थातच ‘भेल’ या कंपनीचे विद्युत अभियंत्यांचे ३० जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दोन अशा पद्धतीने या अभियंत्यांच्या देखरेखीखाली मतदान यंत्राचे काम केले जाणार आहे.
जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक या दोन मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात असून, नाशिक मतदारसंघात १६ पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढवित असल्यामुळे या मतदारसंघात दोन बॅलेट युनिट म्हणजेच ईव्हीएम लावण्यात येणार आहेत. दिंडोरीत अवघे ८ उमेदवार आहेत. जिल्ह्यात धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व सटाणा या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असल्याने तिन्ही मतदारसंघांत ५५१३ बॅलेट युनिट व तितकेच कंट्रोल युनिट लागणार असून, त्यासाठी ५९६९ व्हीव्हीपॅट आहेत. गेल्या महिन्यात या मतदान यंत्राची तपासणी विधानसभा मतदार संघनिहाय करण्यात येऊन त्यातील दुरुस्त, नादुरुस्त यंत्रे बाजूला काढण्यात आली होती. आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने येत्या दोन दिवसांत या सर्व यंत्रांमध्ये उमेदवाराचे नाव, निवडणूक चिन्ह ही माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. सदरचे काम तांत्रिक असल्यामुळे त्यासाठी या मतदान यंत्राची निर्मिती करणाऱ्या ‘भेल’ कंपनीचे विद्युत अभियंत्यांच्या निगराणीखाली केली जाणार असून, यंत्रांमध्ये माहिती फीड झाल्यानंतर मात्र हे अभियंतेच यंत्राला सील करणार आहेत. त्यासाठी ‘भेल’ने ३० अभियंत्यांची नेमणूक केली आहे.