जायखेडा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जायखेडा ग्रामपंचायतीमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, गावात येणारे सर्व मार्ग बंद करून कोरोना या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग होऊ नये, याकरिता गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य सॅनिटायझर गेट तयार करण्यात आले आहे. यामुळे गावात प्रवेश करणारे प्रत्येक वाहन व व्यक्तीला या गेटमधून जाणे बंधनकारक असल्याने निर्जंतुकीकरण होण्यास मोठी मदत होत आहे. सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांची कल्पकता व कौशल्याचा योग्य वापर करून कमी खर्चात हा ‘जुगाड’ करत ‘सॅनिटायझर गेट’ तयार करून प्रेरणादायी व स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे तसेच नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. अंबिका मंदिराजवळील गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर याची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते उद्धव जगताप यांनी आपले तांत्रिक कौशल्य वापरून शेतपिकास औषध फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारे पिस्टन पंप, फवारणी गन व ठिबकच्या नळ्या आदी साहित्याचा वापर करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. यासाठी आबा गुरव, दत्तात्रेय अहिरे, विजय जगताप, किरण निकुंभ व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.----------------गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर गेट उभारणीची संकल्पना चर्चेतून पुढे आली. उपक्रम योग्य वाटल्याने आम्ही विलंब न करता तत्काळ गेटची तयारी केली. यामुळे बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती निर्जंतुक होण्यास मदत होऊन, कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखता येईल.शांताराम अहिरे, सरपंच, जायखेडा
जायखेडा येथे सॅनिटायझर गेटची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 3:54 PM