नामपूर : कोरोनाच्याविरोधात लढण्यासाठी तांदुळवाडी (ता. बागलाण) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. बाहेरगावावरून मुळ गावी आलेल्या आपल्याच नागरिकांपासून तांदुळवाडीवासियांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, याकरिता ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर गेटची उभारणी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. यासाठी नऊ हजार नऊ रुपये खर्च आला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांना वेळोवेळी आपले, आपल्या कुटुंबियांचे, मित्र परिवारांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सूचित केलेले आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार तांदुळवाडीमध्ये होऊ नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने प्रारंभी दवंडी देण्यात आली. तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या या सर्व नागरिकांनी आपली तपासणी स्वत: जातीने दवाखान्यात जाऊन करून घेण्याचेही आदेश काढले गेले. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याप्रति जागरूक असणाºया तांदुळवाडी येथील सरपंच प्रकाश बोरसे, उपसरपंच समीर भामरे, ग्रामसेवक योगेश भामरे, अतुल भामरे यांच्यासह गावातील तरुण महेश भामरे, योगेश भामरे, गोपी भामरे, दगा भामरे, गोविंद भामरे, यांनी अथक परिश्रम घेऊन सॅनिटायझर गेटची उभारणी केली. तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचा सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तांदुळवाडी येथे सॅनिटाझर गेटची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 3:32 PM