नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी साधुग्रामच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी चार वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, रामकुंड परिसर, गोदाघाटासह शहरातील भाविक मार्गांच्या स्वच्छतेसाठी निविदा दर प्रशासनाने निश्चित केल्यानंतर त्याच्या मंजुरीसाठी येत्या सोमवारी (दि.२९स्) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या वच्छतेसाठी महापालिकेला सुमारे पावणेपाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीकाळातील तीन महिन्यांच्या कालावधीत साधुग्रामसह भाविक मार्ग, शाही मार्ग, रामकुंड, गोदाघाट परिसर आणि वाहनतळ आदि ठिकाणी दैनंदिन स्वच्छतेचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिकेने या ठिकाणी दैनंदिन स्वच्छतेसाठी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सफाई कामगार भरती प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले. त्यानुसार ई-निविदा मागविण्यात आल्या असता सुरुवातीला मुंबईरोड व गंगापूररोडवरील भाविक मार्ग वगळता अन्य ठिकाणी प्रत्येकी एकच मक्तेदाराने प्रतिसाद दिला. त्यानंतर तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद न मिळाल्याने चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. चौथ्यावेळी साधुग्राम वगळता अन्य ठिकाणी मक्तेदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यातही भाविक मार्गासाठी एकाच मक्तेदाराने चार ठिकाणी निविदा भरल्या. परंतु एकाच मक्तेदाराला दोनपेक्षा अधिक काम देता येत नसल्याने इतर न्यूनतम दराच्या निविदाधारकाचा विचार करण्यात आला. रामकुंड व गोदाघाट परिसरासाठी ३९.१० टक्के जादा दराने तर उर्वरित भाविक मार्गांसाठी ३५ टक्के जादा दराने स्वच्छतेचा ठेका देण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. निविदांमधील अटी-शर्ती पाहता साधुग्रामसाठी कोणीही मक्तेदार पुढे आलेला नाही. साधुग्रामसाठी १३२० मनुष्यबळाची आवश्यकता आहे. साधुग्राम परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेपुढे पेच निर्माण
By admin | Published: June 27, 2015 1:51 AM