नांदगाव : येथील रेल्वे स्टेशनवर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहास जमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या उपयोगात असलेल्या ब्रिटिशकालीन पादचारी पुलावर त्याकाळी ज्या कंपनीने तो बनवला होता, त्या कंपनीचे नाव आहे. ते असे ‘जोसेफ वेस्टवूड लिमिटेड इंजिनिअर्स अंड कॉट्रक्टर लंडन’ त्याखाली १९०४ असे साल टाकण्यात आलेले आहे. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा सदर ब्रिटिश कंपनीकडून रेल्वेला पत्र आले. ‘आम्ही दिलेल्या हमीनुसार पुलाचे आयुष्य आता संपले आहे. यापुढे आमची जबाबदारी उरली नाही’ अशा आशयाचे ते पत्र होते. आपल्या कामाची जबाबदारी १०० वर्षे घेणाऱ्या ब्रिटिश कंपनीच्या त्या पत्राची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर २०२० पर्यंत लाखो प्रवाशांना आपल्या अंगावरून वाहणारा हा पूल अद्यापही दिमाखात उभा आहे. पुलाच्या कठड्यावर अलीकडे सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आल्याने जोसेफ वेस्टवूड कंपनीचे नाव जाळीमागे गेले आहे. एकेकाळी धुरांच्या रेषा सोडत येणारी मामाची गाडी. ज्यांनी या पुलावर उभे राहून बघितली होती. त्यांच्या फक्त आठवणी उरणार आहेत.एक नंबरच्या प्लेटफॉर्मवर नवीन पुलाचा पाया खणण्याचे काम सुरू झाले आहे. तो सध्याच्या पुलापेक्षा अधिक रु ंद व भव्य असेल. मात्र त्या पुलाचा रस्ता शहरातून येणाऱ्यांसाठी काहीसा दूर मालधक्क्यातून येणारा असणार आहे. दोन नंबरच्या फलाटावर अप बाजूचा सिग्नल मागे सरकणार असून, दोन्ही बाजूचे फलाटाची लांबी वाढणार आहे.
नांदगावला नवीन पादचारी पुलाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:26 PM