नाशिक : गणेशोत्सवाबरोबर पावसानेही घेतलेला निरोप, अचानक बदललेले वातावरण, उत्सवकाळात जागोजागी तयार झालेले कचºयाचे ढीग त्यामुळे डास, माशा, चिलटांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे सध्या नाशिककरांना ताप-थंडी-सर्दी-खोकला या साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.घरोघरी किमान एकतरी व्यक्ती या साथीच्या आजारांनी ग्रस्त असून शासकीय, खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी आढळत आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिणे, संसर्गजन्य आजाराची लागण होणार नाही यासाठी पुरेशी काळजी घेणे गरजेचे असून, ताप-थंडीची लक्षणे आढळल्यास दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य, विश्रांती, सकस आहार, सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी ही सारी पथ्ये सांभाळून साथीच्या आजारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. काळजी न घेतल्यास आजार पसरून आरोग्य धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सध्या वातावरण बदलल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असले तरी योग्य काळजी घेतल्यास स्वत:ला सुरक्षित ठेवणे शक्य आहे. या काळात ऋतुचर्या, दिनचर्या पाळण्यावर भर द्यावा. पाणी उकळून प्यावे. बाहेरचे, उघड्यावरचे खाणे, फास्टफूडचे सेवन टाळावेत. घराबाहेर पडताना टोपी, स्कार्फ, गॉगल, छत्री आदींचा वापर करावा. या दिवसात आहारात दूध, तुपाचे प्रमाण वाढवावे. झोप, व्यायाम यावर भर द्यावा. साथीचे आजार टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे. सर्दी, ताप, खोकला झाल्यास घरगुती उपाय न करता, अंगावर न काढता औषधोपचारावर भर द्यावा.
साथीच्या आजारांची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:24 AM