सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सदर भीषण अपघात झाला. यात दोन देवीभक्तांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नाशिक व संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य १५ भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.इगतपुरी तालुक्यातील विल्होळी जवळील सारुळ येथे भवानी मातेचे मंदिर आहे. सारुळ परिसरातील सांजेगाव, लहांगेवाडी व अन्य गावातील युवक ट्रक घेऊन रविवारी (दि. ७) रोजी तुळजापूर येथे गेले होते. तुळजापूर येथून मशालज्योत घेऊन धावत व सोबत तीन दुचाकीसह युवक इगतपुरी तालुक्याकडे कूच करीत होते. नांदूरशिंगोटे गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबून मशालीत तेल टाकण्यासाठी व ज्योतीची काजळी काढण्यासाठी धावणारे युवक व त्यांच्यासोबत असलेले दुचाकीवरील युवक थांबले होते. त्यांच्यासोबत असणारा ट्रकही रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. काही युवक ट्रकखाली उतरले होते.याचवेळी लोणीकडून नांदूरशिंगोटेकडे येणाºया कंटेनेरने (क्र. एम. एच. ०४ जी. सी. ६८७) रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुचाकींना व उभ्या असलेल्या युवकांना चिरडले. त्यानंतर एक दुचाकी कंटेनेरमध्ये अडकली. सदर कंटेनेरने दुचाकी सुमारे एक किलोमीटर नांदूरशिंगोटे गावापर्यंत फरफटत नेली.या अपघात अक्षय शिवाजी बोकुड (२२) रा. सांजेगाव ता. इगतपुरी व बबन गोविंदराव खंदाळे (२३) रा. लहांगेवाडी ता. इगतपुरी हे जागीच ठार झाले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य जखमींना संगमनेर व नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातात गोरख तुकाराम डगळे, अनिल रामदास भोईर, समाधान मधु शिंदे, प्रकाश पांडू गुंड, गौरव संजय ढगे, हिरामण गोटे, रवी लहू भोईर, विनोद अशोक तांबडे, मच्छिंद्र लक्ष्मण भोईर, राजाराम लक्ष्मण आचारी यांच्यासह अन्य आठ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनेरचालक फरार झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात कंटेनेर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, शशिकांत उगले, नवनाथ शिंदे, उमेश खेडकर, प्रकाश सोनवणे तपास करीत आहेत.चौकट- नांदूरशिंगोटे येथे घेणार होते विश्रांती..तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणारे युवक नांदूरशिंगोटे येथे काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा इगतपुरी तालुक्याकडे प्रस्थान करणार होते. काही मिनिटांसाठी मशालीत तेल टाकण्यासाठी ते निमोण रस्त्याजवळील उड्डाण पुलाजवळ थांबले होते. याच काळात त्यांच्यावर काळाने घाला घातला.
कंटेनेरने देवीभक्तांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 5:59 PM