लोहोणेर : लोहोणेर ग्रामपंचायतीकडून आंबेडकरनगर व परिसरातील काही ठिकाणी जवळपास सहा ते सात महिन्यांपासून नळांना गटारीचे घाणमिश्रित व साबणाचे फेस असलेल्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रत्यक्ष पाण्यात दोष आढळून आला. परंतु दूषित पाणी पाइपलाइनमध्ये नक्की कुठून व कसे येते याचा शोध मात्र अद्याप ग्रामपंचायतीस लागलेला नाही. ग्रामस्थांनी याबाबत दिलेल्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दूषित पाणीपुरवठा आजवर सुरळीत ठेवला आहे. याबाबतच्या तक्रारी लोहोणेर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या आहेत. मात्र आरोग्याला बाधक असलेल्या या दूषित पाण्याच्या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असेल तर ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल प्रवीण आहिरे यांनी केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने योग्य तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
लोहोणेरला दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 12:40 AM