कोनांबे : शासनाच्या प्रस्तावित मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत कोनांबेकरात संभ्रम निर्माण झाला आहे. हा समृद्धी महामार्ग कोनांबे परिसरात नेमका कोठून जाणार याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने शेतकरी धास्तावले आहोत. अनेक शेतकऱ्यांजवळ कमी क्षेत्र असल्याने आपल्या बागायतीतून तर हा मार्ग जाणार नाही ना ? या शंकेने अनेकांचे धाबे दणाणले आहे. समृद्धी महामार्ग म्हणजे मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने तो कोणत्याही परिस्थितीत होणारच अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. परंतु, कोनांबे परिसरात नेमक्या कोणत्या भागातून हा महामार्ग जाणार हे अद्याप निश्चित नसल्याने अनेक अफवा उठविल्या जात आहे. अगोदरच्या सर्वेक्षणानुसार हा महामार्ग कोनांबे गावाच्या उत्तरेकडून म्हणजेच शिवडे घाटातून वर आल्यानंतर वॉटर सप्लायच्या जवळून बेंदातून जाणार असल्याचे समजते. मात्र, कोनांबेवासीयांना कधी हा महामार्ग जुना डुबेरे रस्ता म्हणजे धोंडबारच्या कवटे वस्तीवरुन नाऱ्याचा खोरा, लगन धोंडी येथून जाणार असल्याचे सांगण्यात येते, तर कधी गावाच्या थळ भागातून जाणार असल्याचे बोलले जात आहे. अगोदरच कमी क्षेत्र असऱ्या शेतकरी या अफवांमुळे अस्वस्थ होत आहेत.तालुक्यात या महामार्गासाठी अनेक ठिकाणी भूसंपादनाच्या पूर्वतयारीनुसार सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. परंतु कोनांबे परिसरात तशा हालचाली दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. (वार्ताहर)
समृद्धी महामार्गाबाबत कोनांबेकरात संभ्रम
By admin | Published: September 09, 2016 12:59 AM