नाशिक : विविध कारणांनी गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या एकूणच कारभारावर रुग्ण नाराज असतानाच आता त्यात व्यवस्थापनाच्या हेकेखोर व मनमानी वर्तणुकीच्या विरोधात लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करण्यात आल्या असून, मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सदरचा प्रश्न गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सफाई कर्मचाऱ्यांकडून रुग्णांवर उपचार करून घेणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी उर्मटपणे वागणे, सहअधिकारी व परिचारिकांना अपमानास्पद वागणूक देणे, नको असलेली पदे भरून शासनाची फसवणूक करणे, यंत्रसामग्री बंद ठेवून रुग्णांना त्यांच्या उपचाराच्या हक्कापासून वंचित ठेवणे आदी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी यापूर्वीच आरोग्य संचालकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या असून, त्यातच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांच्या विरोधात सहअधिकारी व परिचारिकांनीही बंड पुकारण्याची तयारी केली आहे. सदर वैद्यकीय अधीक्षकांच्या वर्तणुकीविषयी व मनमानी कारभाराविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी आरोग्य खात्याकडे करण्यात आल्या असून, त्यात लासलगाव नियुक्ती असताना त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय जनतेला आंदोलन करावे लागले होते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याच्या भीतीपोटी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती नेमून त्यांना सक्तीने रजेवर पाठविण्याची कृती करावी लागली होती. त्यानंतरही त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी तक्रारी होण्याच्या प्रकारात घट झालेली नाही. संदर्भ सेवा रुग्णालयातही त्याचीच पुनरावृत्ती केली जात असून, त्यामुळे परिचारिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे तर अन्य वैद्यकीय अधिकारीही सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यातुनच संदर्भ सेवा रुग्णालयात सर्वच पक्षांना अनेक वेळा आंदोलने करावी लागली असून, शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज रुग्णालय उभारले, त्याचा गवगवा होण्याऐवजी शासनाची बदनामीच अधिक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.खासगी प्रॅक्टीसकडे अधिक कलसत्ताधारी पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींनी थेट आरोग्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे व रुग्णालय व्यवस्थापनाबाबत सभागृहातच प्रश्न उपस्थित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काही माहितीही त्यांनी गोळा केली असून, मिळालेल्या माहितीवरून रुग्णालयाच्या काही कर्मचाºयांनी या संदर्भात पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय अधीक्षकांचे स्वत:चे अस्थिव्यंगोपचार रुग्णालय असल्यामुळे त्यांचा कल खासगी प्रॅक्टीसकडे अधिक असल्याची तक्रारही केली जात आहे.
संदर्भ रुग्णालय अधिवेशनात गाजण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:15 AM