नाशिक : निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्यांच्या ताब्यातील साखरेची विक्री करून थकबाकी वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या प्रशासक मंडळाने दोन्ही साखर कारखान्यांना सात दिवसांची नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून दोन दिवसांचा कालावधी उलटला असून, आता पाचच दिवस शिल्लक आहेत.जिल्हा बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाने निफाड साखर कारखाना तसेच नाशिक साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व कामगार युनियनशी साखर विक्रीसंदर्भात त्रिपक्षीय करार पुढे केला आहे. मात्र दोन्ही कारखान्यांच्या संचालक मंडळाने हा करार मान्य नसल्याचे सांगत करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. दरम्यानच्या काळात जिल्हा बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाला संबंधित साखर कारखान्यांच्या ताब्यात असलेली साखर विविध तांत्रिक अडचणींमुळे विक्रीही करता येत नव्हती. न्यायालयाची स्थगिती उठताच साखर विक्रीचा मार्ग मोकळा झाला होता. आता त्यातच औद्योगिक कामगार न्यायालयाकडून साखर विक्रीस असलेली स्थगितीही औद्योगिक कामगार न्यायालयाने उठविल्याने जिल्हा बॅँकेचा संबंधित साखर कारखान्यांच्या गुदामातील साखर विक्रीतील अडथळा दूर झाला आहे. १० जून रोजीच यासंदर्भात जिल्हा बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाने नाशिक सहकारी साखर कारखाना व निफाड सहकारी साखर कारखान्याला पत्र देऊन सात दिवसांच्या आत तुम्ही साखर विक्री करावी, अन्यथा जिल्हा बॅँकेचे प्रशासक मंडळ ठरल्यानुसार साखर विक्री करणार असल्याचे नमूद केले आहे. आता दोेन्ही साखर कारखान्यांचे काही संचालक कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी शासनाकडून कर्जास हमी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ही हमी वेळेत मिळाली नाही तर साखर विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)दरम्यान, ३१ मे रोेजी जिल्हा बॅँकेच्या सेवेतून २२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले, त्यातील एका वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्यास पुन्हा संचालक मंडळाने दोन वर्षांसाठी विशेष पदावर नियुक्ती दिली आहे. कामगार युनियनने या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. मालेगाव तालुक्यातील चार पोल्ट्री फार्मला दिलेल्या कर्जात या अधिकाऱ्याने ७५ लाखांची अनियमितता केल्याचा ठपका असून, त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याने चर्चा सुरू झाली आहे. प्रशासक मंडळाने मात्र कामकाजातील शिस्त आणि नियम पाळून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याआधीही सेवानिवृत्तीनंतर सेवेत घेतले असून, या नियुक्तीत वरिष्ठ वेतनश्रेणी असल्याने त्यांना घेतले, अन्य कोणी त्यासाठी पात्र नसल्याचे स्पष्ट केले आहे.