शहरात रविवारी दुपारनंतर मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव होऊन रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३.२ मि.मी. पाऊस पडला होता. त्यानंतर मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभरात दुपारी १ वाजेच्या सुमारास, तसेचे संध्याकाळी चार वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत हलक्या ते मध्यम सरींची संततधार सुरू होती. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ५.२ मि.मी. पाऊस मोजला गेला. त्यानंतर पावसाने रात्री दहा वाजेपर्यंत उघडीप दिली होती.
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने संध्याकाळी सुरू झालेल्या संततधारेमुळे चाकरमान्यांसह व्यावसायिकांचीही तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या विकासकामांमुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसून आले, तसेच खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेषत: शहरातील गंगापूररोड, टिळकवाडी, अण्णा भाऊ साठे चौक, पंचवटी, रामवाडी या भागांत खोदकाम सुरू असल्याने येथून मार्गक्रमण करताना नागरिकांचे हाल होत आहेत.
---इन्फो--
पुढील तीन दिवस पाऊस
कुलाबा वेधशाळेकडून रविवारी वर्तविण्यात आलेल्या पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार उत्तर-मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार सरींचा वर्षाव होणार आहे. नशिक जिल्ह्यातसुद्धा पुढील तीन दिवस पावसाची दमदार हजेरी राहणार आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांना जोरदार पावसाने झाेडपून काढले.