नाशिक : जिल्हा रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने अधिपरिचारिकेच्या दुचाकी वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात अली. दुचाकीची तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याआधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
संबंधित संशयित कर्मचारी हा जिल्हा रुग्णालयात कोरोना काळापासून कामकाज करीत होता. मात्र, कोरोनानंतर त्याची नेमणूक रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये करण्यात आली होती. बुधवारी सकाळच्या सुमारास संशयित सतीश अहिरे (रा. पंचवटी) याने रुग्णालयातील अधिपरिचारिकेच्या दुचाकी वाहनाची तोडफोड केली. वाहनाचे स्पीडमीटर फोडले, तसेच दोन्ही चाकांची हवादेखील काढण्यात आली. परिचारिकेने स्वच्छता निरीक्षकाकडे संशयिताची तक्रार केल्यानंतर त्याच्यावर गुरुवारी (दि.५) कारवाई करण्यात आली.
संशयिताची ड्यूटी पूर्वी बालकांच्या अतिदक्षता विभागात होती. ड्यूटीवर असताना कामकाजाच्या मुद्यावरून परिचारिका आणि त्याच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरूनच त्याने दुचाकीची तोडफोड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.