नाशिक : रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे पकडून ती कोंडवाड्यात टाकण्याचे काम महापालिका करत आली आहे. त्यासाठी ठेका दिला जात असतो. परंतु, मोकाट जनावरांना पकडल्यानंतर संबंधित पशुपालकांकडून मारहाणीचे प्रकार घडत असल्याने यंदा तीनदा निविदाप्रक्रिया राबवूनही ठेकेदार पुढे आलेला नाही. परिणामी, मोकाट जनावरांचा संचार नागरिकांबरोबरच प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. मोकाट गुरांचा ठिय्या रस्ता वाहतुकीला अडथळा ठरत असतोच शिवाय त्यामुळे अपघाताच्याही घटना घडलेल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट असून, त्याठिकाणी या गुरांनी उच्छाद मांडलेला असतो. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेमार्फत जनावरे पकडून ती महापालिकेच्या कोंडवाड्यात टाकण्याचा ठेका काढला जातो. गाय, म्हैस, बैल, शेळी आदि जनावरांच्या वर्गवारीनुसार संबंधित पशुपालकांकडून दंडाची वसुली केली जाते. त्यातून महापालिकेला खूप महसूल प्राप्त होत नसला तरी, नागरिकांची गैरसोय होऊ नये व रस्त्यांत अडथळे उत्पन्न होऊ नयेत, यासाठी सदर काम केले जाते. महापालिकेने यंदाही मोकाट जनावरे पकडण्यासाठी निविदा काढल्या; परंतु तीनवेळा निविदाप्रक्रिया राबवूनही ठेका घेण्यास ठेकेदार पुढे आलेला नाही. सद्यस्थितीत ज्याच्याकडे ठेका आहे त्यानेही पुन्हा ठेका घेण्यास उत्सुकता दाखविलेली नाही. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित पशुपालकांकडून मारहाण केली जात असते. याशिवाय काही नागरिकांकडूनही गायीसारखी जनावरे पकडण्यास विरोध केला जातो. मारहाणीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार ठेकेदाराची आहे. अनेकदा पशुपालकांकडून दमदाटीच्याही घटना घडत असतात. त्यामुळे ठेका घेण्यास कोणीही पुढे आलेला नाही. महापालिकेकडे सध्या ज्या तक्रारींचा ओघ सुरू आहे, त्यात मोकाट जनावरांसबंधीही अनेक तक्रारींचा समावेश आहे. महापालिकेकडे पूर्वी चार कोंडवाडे होते. सद्यस्थितीत नाशिकरोड व सातपूर येथीलच कोंडवाडे सुरू आहेत. जुन्या नाशकातील भद्रकालीतील कोंडवाड्याचीही क्षमता ८ ते ९ जनावरे थांबू शकतील इतकीच आहे. शहरात मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव लक्षात घेता महापालिकेने कोंडवाड्यांची संख्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जनावरे पकडण्यासाठी मिळेनात ठेकेदार
By admin | Updated: October 8, 2015 00:26 IST