ठेकेदार जोमात, महापालिका कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:55 PM2020-12-30T23:55:12+5:302020-12-31T00:30:21+5:30
महापालिकेत ठेकेदारीच्या नावाखाली लुटालूट सुरू असून भाजपाकडूनच ठेकेदारांना आणून कामे दिली जात असल्याचा आणि त्यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.३०) राजीव गांधी भवनासमेार निदर्शने करण्यात आली.
नाशिक : महापालिकेत ठेकेदारीच्या नावाखाली लुटालूट सुरू असून भाजपाकडूनच ठेकेदारांना आणून कामे दिली जात असल्याचा आणि त्यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.३०) राजीव गांधी भवनासमेार निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीच्या ठेक्या आडून मन्नुभाईला पुन्हा महापालिकेत शिरकाव करण्यास विरोध करण्यात आला असून भ्रष्टाचारी ठेकेदाराला काम देण्याचे षडयंत्र थांबवावे अशी मागणीही या पक्षाने केली आहे.
महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारी आणि त्यातील भ्रष्टाचार गाजत असून काँग्रेस सेवा दलाचे वसंत ठाकूर यांनी या प्रकारांमुळे महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली हेाती. त्यानंतर बुधवारी (दि.३०) काँग्रेस पक्षाच्या वतीने राजीव गांधी भवनात मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ठेकेदार जोमात, महापालिका कोमात, स्मार्ट सिटी, स्मार्ट रस्ता, भ्रष्टाचार केला उठता बसता अशा प्रकारचे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली.
आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, गटनेते शाहु खैरे, वत्सला खैरे, आशा तडवी, समीर कांबळे, बबलू खैरे, सुरेश मारू यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महापालिकेच्या आउटसोर्सिंगच्या ठेक्यात मेाठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून हा ठेका रद्द करावा, भ्रष्टाचारी ठेकेदाराला समोर ठेवून घरपट्टी पाणीपट्टी वसुलीच्या निविदांचे नियम ठरवले जात आहेत. ते रद्द करावे, पेस्ट कंट्रोल, फाळके स्मारक कलामंदिरासह अनेक मनपा इमारतीत खासगीकरणातून सफाईची कामे केली जात आहेत. ती रद्द करावीत, यांत्रिकी झाडूने सफाई करण्याचा प्रस्ताव रद्द करावा, फायर बॉल निविदेतील घोळ बघता हा ठेका रद्द करून अगोदरच्या शिडी खरेदीची चौकशी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.