नाशिक : जानेवारी २०११ मध्ये सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प येथील महापालिकेने उभारलेली स्वागत कमान कोसळून तिघांचा बळी गेल्याच्या दुर्घटनेप्रकरणी जिल्हा न्यायालयाने महापालिकेच्या तीन अभियंत्यांसह ठेकेदारास प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या चौघा आरोपींविरुद्ध कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवतानाच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने सदर निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. पाठक यांनी सोमवारी स्वागत कमानीसंदर्भातील खटल्यात निकाल दिला. न्यायालयाने महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय मुकुंद धर्माधिकारी, उपअभियंता सुनील श्रावण रौंदळ, शाखा अभियंता मोहमंद खलिद मोहमंद गौस आणि सरकारी ठेकेदार किशोर मुरलीधर एखंडे यांना दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली. तर ठेकेदाराकडील सुपरवायझर आनंद गोमाजी चौरे व संजय बेनदेव म्हस्के यांची निर्दोष मुक्तता केली. देवळाली कॅम्प येथील लॅमरोडवरील सौभाग्यनगर येथे महापालिकेमार्फत स्वागत कमान उभारण्याचे काम सुरू होते. दि. १८ जानेवारी २०११ रोजी सदर स्वागत कमान कोसळली. यावेळी कमानीखालून जाणाऱ्या रिक्षावर (एमएच १५ - ५५२९) कमानीचा वरचा भाग कोसळल्याने रिक्षा दबली जाऊन त्यात रिक्षाचालक सुरेश दादा पगारे आणि प्रवासी धनश्री विजय घायवटे यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर आनंदा बुद्धपाल नन्नावरे हा लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. नंतर जखमी आनंदा नन्नावरेचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सदर दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दुर्घटनेचे पडसादही उमटले होते. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामकाजाबद्दल लोकप्रतिनिधींनी लक्षही वेधले होते. दरम्यान, पोलिसांनी सदर दुर्घटनेबद्दलचा खटला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यावर सुमारे साडेचार वर्षे सुनावणी चालली. न्यायालयाने या प्रकरणात १२ साक्षीदार तपासले. तीन अभियंत्यांसह ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. ए. जे. देशमुख यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
तीन अभियंत्यांसह ठेकेदारास दोन वर्षे शिक्षा
By admin | Published: August 03, 2015 11:22 PM