नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वकाळातील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी गोदाघाटासह भाविक मार्गांच्या साफसफाईचा ठेका महापालिका स्थायी समितीने रोखून धरत स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याचा आग्रह प्रशासनापुढे धरला. समितीने सदरचा प्रस्ताव तहकूब करत त्यासंबंधी मंगळवारी (दि.३०) सकाळी १० वाजता आयुक्तांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा बैठक बोलाविली आहे. दरम्यान, वाल्मीकी, मेघवाळ व मेहतर समाज संघर्ष समितीनेही ठेका रद्द करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या बुधवारपासून (दि. १ जुलै) महापालिकेसमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सिंहस्थविषयक सुमारे २५ कोटी रुपयांच्या कामांचे व साहित्य खरेदीचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने सिंहस्थात रामकुंड, गोदाघाट परिसर तसेच भाविक मार्ग, वाहनतळ आदि ठिकाणी साफसफाई करण्यासाठी सुमारे पावणे पाच कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव होता. स्वच्छतेच्या ठेक्यावरून आधीपासून आक्रमक भूमिकेत असलेल्या वाल्मीकी, मेघवाळ व मेहतर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्थायीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दालनासमोर ठाण मांडून होते. समितीचे पदाधिकारी सुरेश दलोड, सुरेश मारू यांच्याकडून बैठकीस उपस्थित राहणाऱ्या स्थायीच्या प्रत्येक सदस्याला निवेदन देऊन ठेक्याला विरोध करण्याची विनंती केली जात होती. याशिवाय पदाधिकाऱ्यांनी सभापती शिवाजी चुंभळे यांचीही भेट घेऊन सदर ठेका रद्द करत वंशपरंपरेने साफसफाईचे काम करणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच सफाईची कामे देण्याचा आग्रह धरला. स्वच्छतेच्या ठेक्याबाबत होणारा विरोध आणि सुमारे ३५ ते ३९ टक्के जादा दराने आलेल्या निविदा याबाबत बैठकीत वादळी चर्चा होण्याचे संकेत मिळाले होते. सदस्य यशवंत निकुळे यांनी सदर प्रस्तावावर आयुक्तांच्याच उपस्थितीत चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगत विषय तहकूब करण्याची सूचना मांडली. त्यावर सभापती शिवाजी चुंभळे यांनी सदर ठेक्याविषयी स्थानिक नागरिकांच्याही तक्रारी असल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि.३०) सकाळी १० वाजता पुन्हा एकदा बैठक बोलाविण्यात येत असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)
गोदाघाटासह भाविक मार्गांच्या साफसफाईचा ठेका
By admin | Published: June 30, 2015 1:00 AM