नाशिक : ब्राह्मण समाजातील धुरिणांनी यापूर्वीदेखील समाजातील अनिष्ट रुढीपरंपरांना फाटा देत पुरागामित्वाच्या चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले. त्यामुळे ज्ञाती बांधवांसह संपूर्ण समाजासाठी योगदान देण्याचे कार्य संस्थेने यापुढेदेखील असेच सुरू ठेवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशस्थ ऋग्वेदी संस्थेने तिडके कॉलनीनजीक उभारलेल्या देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालयातील ऋग्वेद सभागृहाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी गत ८८ वर्षांत अनेकांनी योगदान दिले असून, त्या मान्यवरांमध्ये माझे नाव जोडले गेल्याचा खूप अभिमान असल्याचे सांगितले. कोरोनाच्या या अडचणीच्या वर्षातदेखील संस्थेने आपल्या ज्ञाती बांधवांसह अन्य समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारून मदतीचा हात दिल्याने संस्थेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आपण बालपणापासून समाजाकडून काही ना काही घेत असतो. कुणीतरी स्थापन केलेल्या शाळा, काॅलेजेसमध्ये आपण शिकून मोठे होतो. जेव्हा आपण काही देण्याच्या पात्रतेचे होतो, त्यावेळी आपल्या ज्ञातीसह सर्व समाजासाठी काही देणं द्यावे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. आपण सातत्याने काही सपोर्ट सिस्टीम तयार करावी, त्यामुळे कोणतेही धक्के पचविता येतात. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, सुहास पाटील, मकरंद सुखात्मे, हेमंत कुलकर्णी, डॉ. अभय सुखात्मे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
--इन्फो--
२ टक्के ९८ टक्क्यांत मिसळू द्या
ब्राह्मण समाज अवघा दोन टक्के असल्याने तुम्ही काय राजकारण करणार? असे माझे काही मित्र मला म्हणायचे. पण हाच दोन टक्के समाज अन्य ९८ टक्के समाजाशी जेव्हा मिळून मिसळून वागतो, त्यावेळी तो १०० टक्के समाजात एकरूप होऊन जातो. मग हा समाजदेखील आपल्याला बरोबरीची आणि सन्मानाची वागणूक देताे, असेदेखील फडणवीस यांनी नमूद केले.
--इन्फो--
१२ वर्षांनी मी पुन्हा येईन
देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी अजून १२ वर्षांनी संस्थेचे शतकमहोत्सवी वर्ष असल्याने तुम्ही नक्की या कार्यक्रमाला या, अशी विनंती केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी या सभागृहात उपस्थित असलेले सर्व नागरिकांसह मीदेखील त्या कार्यासाठी पुन्हा नक्की येईन, असा विश्वास व्यक्त केला.
फोटो---
पीएचजेएन ८०
देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या ऋग्वेद सभागृहाचे उद्घाटन देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या ऋग्वेद सभागृहाचे उद्घाटनप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस. समवेत व्यासपीठावर अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, सुहास पाटील, मकरंद सुखात्मे, हेमंत कुलकर्णी, डॉ. अभय सुखात्मे, आदी उपस्थित होेते.