दाभाडी : येथे मिळून आलेले १४ कोरोनाचे रुग्ण आरोग्यसेवकांच्या परिश्रमामुळे ठणठणीत बरे झाले असून, गाव कोरोनामुक्त झाले आहे. गावात कोरोनामुक्तीसाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते आणि सेवाभावी आरोग्य संघटना धडपड करीत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजविला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांसह गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यातच मालेगाव तालुक्यातील दाभाडीसह परिसरातील ग्रामस्थ व कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला दाभाडीतील अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी धावून आले आहेत.मालेगाव शहरात एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. या आजाराचे लोण शहरापासून जवळच असलेल्या दाभाडी गावात येऊ नये म्हणून मराठा महासंघाकडून दाभाडी गावात येणाऱ्या सीमा बंद करीत पोलिसांना मदत म्हणून गावातील मुख्य गेटवर १५ दिवस सुरक्षा व देखरेख ठेवण्यात आली. गावातील इंदिरानगर, न्यू प्लॉट, रोकडोबानगरसह गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. गावात २०० पेक्षा अधिक मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. दुकानदारांना सोशल डिस्टन्सचे चौकोन आखून देण्यात आले. गावातीलच शेतकऱ्यांकडून शेतमाल कमी दरात विकत घेत श्रमिक वाड्या-वस्त्यांवरील दोन हजार व्यक्तींना आठ दिवस पुरेल एवढा भाजीपाला घरपोच मोफत देण्यात आला.मसगा महाविद्यालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नास्त्याची दिलेली जबाबदारी मराठा महासंघ पार पाडीत आहे. यासाठी जिल्हा उपाध्यक्ष हरिदादा निकम, जिल्हा सचिव अमोल निकम, मंगेश निकम, सुरेश पवार, कारभारी निकम, नामदेव अहिरे, खंडेराव देवरे, बापू भामरे, रावसाहेब निकम, दीपक निकम, भारत निकम, कैलास निकम, महेश महाले, महेश निकम, दिनेश महाले, रोहित निकम, गणेश साठे, प्रवीण निकम, गोकुळ मोरे, योगेश देवरे, अजय निकम, आशिष निकम, घनश्याम निकम, शिवाजी कापडणीस, अनिल निकम आदी स्वयंसेवक मेहनत घेत आहेत.----------------जीवनावश्यक वस्तूंचे वाटपलॉकडाऊन काळात ३५०हून अधिक श्रमिक कुटुंबीयांना एक महिन्याचा जीवनावश्यक किराणा घरपोच देण्यात आला. दाभाडीत आढळलेल्या कोरोनाबाधित १४ रुग्णांच्या नास्त्याची जबाबदारी संघटनेने उचलली. त्यात काजू, बदाम, खारीक, खजूर, मनुके, चिक्की असा पोषक आहार देण्यात आला. तसेच पुढील प्रत्येक दिवशी दूध, अंडी, बिस्कीट पुडे व गोड रवा देण्यात आला. त्या आहाराने व आरोग्यसेवकांच्या परिश्रमाने दाभाडीतील सर्व १४ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
दाभाडी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांचे योगदान; आरोग्यसेवकांचेही कठोर परिश्रम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 9:02 PM