नाशिक : संतुलित आहार, न कंटाळता नियमितपणे केला जाणारा व्यायाम आणि आदर्श जीवनशैलीचे पालन हीच मधुमेही रुग्णांच्या सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. यशपाल गोगटे यांनी केले. शहरातील औषध व्यावसायिकांनी आखलेल्या ‘ग्रीन प्लस फार्मसी’ या योजनेच्या शुभारंभाप्रसंगी आय.एम.ए. हॉलमध्ये आयोजित कार्यक्र मात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गोगटे ‘मधुमेह खरोखरच समूळ नष्ट होऊ शकतो का’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे सदस्य तथा माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बदलती जीवनशैली, रात्री उशिराचे जेवण, जंकफूड व फास्टफूडची लागलेली चटक, दुग्धजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन, व्यसनाधीनता या कारणांमुळे मधुमेही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मधुमेहापासून दूर राहायचे असेल तर आदर्श जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. रात्री उशीर होणार असल्यास हलका आहार घ्यावा, असे सांगून मधुमेही रु ग्णांनी साखर, भात, दुग्धजन्य पदार्थ टाळले पाहिजेत, असेही गोगटे म्हणाले. सहआयुक्त मिलिंद पाटील तसेच फॉर्मसी कॉन्सिलचे माजी सदस्य सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर मणिआर यांनी केले. महेश भावसार यांनी आभार मानले. कार्यक्र मास लालाजी मोदानी, मंगेश अलई आदी प्रयत्नशील होते.
पथ्य पाळल्यास मधुमेह नियंत्रित : यशपाल गोगटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:18 AM