नाशिक : राज्यात जे घडले ते योग्य नाही, काही आमचेही लोक चुकले, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे; परंतु त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार अडकले असून, त्यांचे फोन बंद असल्याची माहिती राष्टवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कळवणचे नितीन पवार आणि दिंडोरीचे नरहरी झिरवाळ हे अडकले असून, त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.राज्यात शनिवारी (दि.२३) सकाळी झालेल्या राजकीय नाट्यानंतर राष्टÑवादीचे अनेक आमदार गायब होते. नाशिक जिल्ह्यातील तीन आमदार नॉट रिचेबल होते. या सर्व परिस्थितीनंतर छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील आमदार माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर हे आता संपर्कात आहेत.बनकर यांच्या मुलाची तब्येत ठीक नसल्याने ते नाशिकला सायंकाळी पोहोचले आहेत. मात्र झिरवाळ आणि नितीन पवार हे संपर्कात नसून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचे फोन बंद आहेत. मात्र, नितीन पवार यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला असून, ते नाशिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.दरम्यान, राज्यात शनिवारी (दि.२३) सकाळी घडले ते योग्य नव्हते, काही आमच्याही लोकांच्या चुका झाल्या, जे लोक गेले ते परत आले आहेत. शिवसेना, कॉँग्रेसचे सर्व आमदार एकत्रच आहेत. मित्र पक्षाचेदेखील आमदार कोठेही गेले नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही भुजबळ म्हणाले.... परंतु कोण बोलणार ?अजित पवार यांचे राष्टÑवादीतील वागणे आणि अन्य कृती सर्वांनाच लक्षात येत होती, परंतु कोण बोलणार, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केला. शनिवारी (दि.२३) सकाळी यासंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या गेल्या काही दिवसांतील कृती संशयास्पद असल्याचा आरोप केला होता. त्याला भुजबळ यांनीही दुजोरा दिला.
परिस्थिती नियंत्रणात, मात्र दोन अडकले : भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 1:21 AM