Ravindra Jadhav IAS News: मालेगाव येथील महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचा ठेकेदारांसमवेत झालेल्या बैठकीचा वादग्रस्त व्हिडीओ माजी आमदार आसिफ शेख यांनी समाजमाध्यमांवर शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना हा व्हिडीओ शेअर करत आयुक्त जाधव यांना बडतर्फ करण्याची मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान, आयुक्त जाधव यांनी याबाबत अधिक भाष्य न करता शासनाकडून जेव्हा विचारणा होईल, त्यावेळी उत्तर देईन, अशी भूमिका मांडली आहे.
वाचा >नाशिक विकास प्राधिकरण झाले 'लँडलॉर्ड', अडीच हजार एकर क्षेत्र विनामूल्य मिळणार!
माजी आमदार शेख यांनी मंगळवारी (९ एप्रिल) दुपारी समाज माध्यमांवर व्हिडीओ शेअर केला. ठेकेदारांसमवेत बैठकीचा सदर व्हिडीओ पावणेचार मिनिटांचा असून, तो हिंदी भाषेत आहे. हा व्हिडीओ आयुक्ताच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील जागेचा असून, यात आयुक्त जाधव दिसत आहेत.
त्यांच्या उजव्या हाताला एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी, तर त्यांच्या समोर दोन ते तीन व्यक्ती बसलेल्या असाव्यात, असे चर्चेतून लक्षात येते. संवादात आयुक्तांनी थेट पैशांची मागणी केलेली नसली, तरी समोरील व्यक्ती मात्र त्यांना सारखे तुमचे करून देतो, १० टक्के देण्याबाबत विचारणा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरू आहे.
रवींद्र जाधवांना एसबीने लाच घेताना पकडले होते
रवींद्र जाधव हे मालेगाव महापालिकेत डिसेंबर २०२३ मध्ये आयुक्त पदी रुजू झाले. सुरुवातील कठोर आयुक्त म्हणून नावलौकीकास आलेल्या आयुक्त जाधव यांची कारकीर्द यापूर्वी वादग्रस्त राहिलेली आहे.
धुळे महापालिकेत कार्यरत असताना, त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. तेथे वादग्रस्त असलेले आयुक्त शहरात दाखल झाल्यापासून मात्र कर्तव्य कठोर बनले. मात्र, त्याचवेळी त्यांची कारकीर्द वादात राहिली. त्यांच्याविरोधात येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीसह आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने आंदोलने केली आहेत.
वादग्रस्त कारकीर्दीत व्हिडीओने टाकली भर
नागरी सुविधा समितीचे आत्मदहन आंदोलन, तर चर्चेत आले होते. आयुक्तांच्या स्विय सहाय्यकाला देखील नाशिकच्या लाचलुचपत विभागाने पकडले होते. याशिवाय त्यांच्याच कारकीर्दीत छावणी पोलिसात मनपाच्या तेरा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुक्तांची कारकीर्द अशी वादग्रस्त ठरत असतानाच माजी आमदार आसिफ शेख यांनी आता ठेकेदारांसमवेत विविध कामांच्या बिलांसंदर्भातील आयुक्तांच्या संवादाचा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांना शेअर केल्याने पुन्हा एकदा आयुक्त जाधव चर्चेत आले आहे.