त्र्यंबकेश्वर : येथे नारायण नागबलीच्या विधीच्या अधिकारावरून पुरोहितांच्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शुक्रवारी (दि.७) आनंद आखाड्यातील जागेत त्र्यंबकेश्वर बाहेरील पुरोहितांकडून सुरू असलेल्या नारायण नागबली विधीस हरकत घेत मारहाण करण्याची घटना घडल्याची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अनिल नारायण कुलकर्णी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, कुलकर्णी हे मुळचे अनकाई ता. येवला येथील रहिवासी असून ते त्यांच्या कुटुंबीयांसह गेल्या २० वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथे पौराहित्य करत आहेत. परंतु बाहेरगावचे पुरोहित असल्याने त्यांना त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबलीचा पूजा विधी करू देण्यास स्थानिक पुरोहितांचा विरोध आहे. त्यामुळेच बाहेरील पुरोहितांनी २०१३ मध्ये बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची स्थापना करून नारायण नागबलीचा विधी करू देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. परंतु त्यास सातत्याने विरोध होत राहिला. त्यामुळे बाहेरील पुराहितांनी त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाडच्याची जागा तीन वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर घेऊन तेथे विधी करण्यास सुरूवात केली. त्यानुसार, शुक्रवारी पूजाविधी संपल्यानंतर स्थानिक ३० ते ३५ पुरोहितांनी आनंद आखाड्यात येऊन पूजाविधीस हरकत घेतली आणि पूजाविधी करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला असा सवाल करत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केल्याची तक्रार फिर्यादित करण्यात आलीआहे. दरम्यान, यासंदर्भात त्र्यंबक पोलीसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला असून अद्याप पावेतो कोणालाही ताब्यात घेतले नाही. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे करीत आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधीवरून पुरोहितांच्या गटात वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:20 AM