अधिवेशन तर होणारच..विरोधकांना उत्तरे देण्याची तयारी : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 01:02 AM2021-12-15T01:02:29+5:302021-12-15T01:03:01+5:30
कोरोनाचे कारण पुढे करून सरकार अधिवेशन घेणार नाही. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना येत्या २२ तारखेला अधिवेशन तर होणारच असे सांगत विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देऊ, असे प्रत्तुत्तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
घोटी : कोरोनाचे कारण पुढे करून सरकार अधिवेशन घेणार नाही. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना येत्या २२ तारखेला अधिवेशन तर होणारच असे सांगत विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देऊ, असे प्रत्तुत्तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
इगतपुरी तालुक्यात मुंबई युवक काँग्रेस आयोजित "युवा क्रांती बुनियादी" शिबिराचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय शिबिराच्या समारोपाप्रसंगी थोरात आले होते. नागपूर निवडणुकीतील पराभव, अधिवेशन, अश्या विविध विषयांना हात घालत यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
आमच्या सरकारने गत दोन वर्षातील कार्य मांडण्याची ही उलट संधी उपलब्ध होत आहे. ती आम्ही घालवणार नाही. कोरोनाच्या काळात चांगल्या प्रकारे काम आमच्या सरकारने केले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम कार्य महाराष्ट्रात आम्ही केले आहे. हे संपूर्ण जनतेने पाहिले आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही, तसेच सुनील केदार आणि नाना पटोले यांच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीका आशिष देशमुखांनी केली. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आरोप-प्रत्यारोपांपेक्षा आत्मचिंतन महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
युवकांना मार्गदर्शन
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तळागाळातून कार्य करत पदांसाठी नाही तर, तत्त्वांसाठी व विचारांसाठी राजकारण करत रहावे म्हणजे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही, असे थोरात यांनी सांगितले. शिबिराचे आयोजन मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष जिशान सिद्दिकी यांनी केले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस कृष्णा अल्लावरू यांनी ध्वजारोहण करून झाला. तालुका काँग्रेसच्यावतीने थोरात यांचा सत्कार करण्यात आला. समारोप थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शिबिरात जवळपास पाचशे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव हरपालसिंग चुडासमा, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव भास्कर गुंजाळ, मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस डॅनियल शेख, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, सेवादल अध्यक्ष दिलीप पाटील, निवृत्ती कातोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------