नाशिक : एलबीटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिका कसोशीने प्रयत्न करत असतानाच आता घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, सुमारे दोन हजार थकबाकीदार मिळकतधारकांनी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत भरणा न केल्यास त्यांच्यावर जप्तीची कुऱ्हाड पडणार आहे. महापालिकेने घरपट्टीच्या माध्यमातून सुमारे १०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. २५ हजार रुपयांपेक्षा जास्त घरपट्टी थकविणाऱ्या ३३४० मिळकतधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या मिळकतधारकांकडे सुमारे २६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेने संबंधित थकबाकीदार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्यानंतर ५५० थकबाकीदारांनी प्रतिसाद देत घरपट्टीचा भरणा केला. त्यामुळे महापालिकेकडे थकबाकीपोटी २ कोटी ७२ लाख १७ हजार ८९३ रुपये जमा झाल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली. ज्या साडेतीन हजार थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या त्यातील काही प्रकरणे ही न्यायप्रविष्ट, तर काहींनी अभय योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. ते वगळून सुमारे २ हजार थकबाकीदार मिळकतधारकांनी येत्या ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत थकबाकीचा भरणा न केल्यास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. जप्तीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त आर. एम. बहिरम यांच्या दालनात मंगळवारी निरीक्षकांची बैठक होऊन जप्तीच्या कारवाईसंबंधी सूचना देण्यात आल्या.
२००० मिळकतधारकांवर जानेवारीत जप्तीची कुऱ्हाड
By admin | Published: December 16, 2014 11:49 PM