मिळकत कर थकविणाऱ्या कॉँग्रेस भवन, सावानावर जप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:07 AM2018-03-28T01:07:19+5:302018-03-28T01:07:52+5:30
महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयासह सिकॉफ, आयमा या उद्योजक संस्थांच्या कार्यालयांचाही समावेश आहे.
नाशिक : महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयासह सिकॉफ, आयमा या उद्योजक संस्थांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. नोटीस बजावल्यापासून २१ दिवसांत संबंधितांनी थकबाकीचा भरणा न केल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मालमत्तांची थेट विक्री केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे. महापालिकेने ३१ मार्चपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टीच्या थकबाकी वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, गेल्या काही दिवसांपासून मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. त्यासंबंधीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. महापालिकेने आतापर्यंत ३९४ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. त्यातील २१ मालम त्ताधारकांनी थकबाकीचा भरणा केला तर ७४ मिळकतधारकांनी भागश: रक्कम भरत जप्तीच्या कारवाईतून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत महापालिकेने ८४ लाख ८९ हजार रुपये थकबाकी वसूल केली आहे. दरम्यान, महापालिकेने महात्मा गांधी मार्गावरील नाशिक जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या मालमत्तेवरही जप्तीची कारवाई केली आहे. जिल्हा कॉँग्रेस भवनकडे २६ लाख ६३ हजार रुपये घरपट्टी थकीत आहे. महापालिकेने यापूर्वीही कॉँग्रेस कमिटीला जप्तीची नोटीस बजावली होती. दोन वर्षांपूर्वी कॉँग्रेस कमिटीने दहा लाख रुपयांचा भरणाही केला होता. आता महापालिकेने पुन्हा एकदा नोटीस बजावतानाच जप्तीची कारवाई केली असून, २१ दिवसांत थकबाकीचा भरणा न केल्यास कॉँग्रेस भवनचा लिलाव करत ते विक्रीला काढले जाणार आहे. याशिवाय, महापालिकेने सार्वजनिक वाचनालयावरही जप्तीची कारवाई केली आहे. सावानानेही मुदतीत रकमेचा भरणा न केल्यास नियमानुसार विक्री केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्तांनी दिली. सावानाकडे ७ लाख ७८ हजार रुपये थकबाकी आहे.
सावानाला थकबाकीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. चार वर्षांची थकबाकी आहे. त्याबाबतचा तपशील महापालिकेकडून मागविल्यानंतर कार्यकारी मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन अंडर प्रोटेस्ट म्हणून रकमेचा भरणा करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन कायदेशीर लढाई लढली जाईल. मुळातच शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयांना घरपट्टी माफ करण्याचे सरकारचे परिपत्रक आहे. त्यासंबंधी पाठपुरावा करू. - श्रीकांत बेणी, कार्यवाह, सावाना
दोन वर्षांपूर्वी कॉँग्रेस कमिटीने १० लाखांचा भरणा केला होता. आता दंड, व्याज यामध्ये कशाप्रकारे तडजोड करता येईल, याविषयी नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सदर थकबाकीबद्दल प्रदेश कॉँग्रेसलाही कळविण्यात येणार आहे. त्याबाबत निश्चितच तोडगा निघेल. - शरद अहेर, शहराध्यक्ष, कॉँग्रेस