नाशिक : काळानुसार बदललेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांना सज्ज रहावे लागणार आहे़ पोलीस दलातील अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी वाहून घ्यावे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांंनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर बुधवारी (दि़ ५) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११४ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी जळगावच्या कल्पेशकुमार चव्हाण यास सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीची मानाची तलवार देऊन माथूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़माथूर पुढे म्हणाले की, राज्य सरकारने नाशिक पोलीस अकादमीला दिलेल्या स्वायत्ततेमुळे पुण्याप्रमाणेच नाशिकचाही नावलौकिक होईल, अशी आशा आहे़ पोलीस दलात सहभागी होणाऱ्यांचे प्रशिक्षण कधीच संपत नसते, त्यामुळे रोज नवीन संधी असते. सद्यस्थितीत पोलीस दलाला नवीन तांत्रिक साहित्य, साधन-सामग्री मिळत असल्याने पोलिसांची कार्यपद्धती तसेच गुन्ह्यांच्या तपासपद्धतीत सुधारणा झाली आहे़ गत ३५ वर्षांमध्ये अकादमीतील सेवा सुविधांमध्ये चांगलीच वाढ झाली असून, हे चित्र आशादायी असल्याचे माथूर यांनी सांगितले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी तुकडीला कालसंगत अशा नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार प्रशिक्षण दिल्याचे सांगितले़ या अधिकाऱ्यांना कायद्याचे ज्ञान हे प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आले असून, गंभीर गुन्ह्यांचा तपास, न्यायालयीन कामकाज, पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर सौहार्दतेची वागणूक अशा सर्व अंगाने प्रशिक्षण देण्यात आले आहे़ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना कोणाचीही तमा बाळगू नका, आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्याबाबत बजाज यांनी मार्गदर्शनात सांगितले़
दीक्षान्त समारंभ : ११४ वी तुकडी; जळगावचा कल्पेशकुमार चव्हाण सर्वोत्कृष्ट
By admin | Published: October 06, 2016 12:39 AM