नाशिक : महाराष्ट्र पाेलीस अकादमीतील १२०व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शनिवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला आहे. पोलीस अकादमीत २४ जून २०२१ पासून सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रातील ३९४ उमेदवारांमध्ये २७८ पुरुष व ११६ महिला असे ३९४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश असून या दीक्षान्त सोहळ्यानंतर हे सर्व पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्र्यंबकराेडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कवायत मैदानावर सकाळी ८ वाजता दीक्षान्त सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार उपस्थित राहणार आहे. प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची संचलनानंतर पारितोषिक वितरण होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षान्त सोहळा होणार होता. मात्र, सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पूर्वनियोजन संपूर्णपणे कोलमडले असून, केवळ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीक्षान्त सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस अकादमीत आज १२०व्या सत्राचा दीक्षान्त सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 1:53 AM