नाशिक : कोरोनाचा शहर व परिसरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये मंगळवारी (दि. ३०) होणारा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या राज्य पोलीस अकादमीचा संचलन सोहळा हा प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या तुकडीसाठी एक अभिमानाची बाब असते; मात्र ११८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणावरच मागील वर्षापासून कोरोनाचे सावट कायम असल्याने या तुकडीतील पोलीस उपनिरीक्षकांच्या पदरी आतापर्यंत निराशाच पडली आहे. कोरोनाचा अचानकपणे प्रादुर्भाव वाढल्यामुळे थाटामाटात पार पडणारा दीक्षान्त सोहळा हा अगदी साधेपणाने आटोपशीर घेतला जाणार असून संचलन रद्द करत केवळ प्रशिक्षणार्थींना अकादमीच्य वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘खाकी’ची शपथ दिली जाणार आहे. शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याकरिता उद्धव ठाकरे यांचा पूर्वनियोजित दौरादेखील रद्द करण्यात आला आहे. प्रशिक्षण कालावधीदेखील लांबलापोलीस अकादमीत ६६८ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी विविध प्रकारचे धडे गिरविले. उपनिरीक्षकांच्या ११८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा १७ महिन्यांपेक्षाही अधिक झाला. मागील वर्षी मार्चमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे या प्रशिक्षणार्थींना अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली. कोरोनाकाळात त्यांचे शारीरिक प्रशिक्षण बंद होते. तसेच सर्वांना सामाजिक अंतर पाळत, व्याख्यात्यांकडून ऑनलाइन पद्धतीने धडे घ्यावे लागले. तसेच दोन महिन्यांपूर्वीच सुमारे ६८ पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना कोरोनाची बाधाही झाली होती. या सर्वांचा परिणाम प्रशिक्षण कालावधीवर होऊन तो १७ महिन्यांपेक्षाही अधिक लांबला. या तुकडीचा कोरोनाने संचलन सोहळ्यापर्यंत पिच्छा पुरविला.
‘पीएसआय’ तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 1:17 AM
कोरोनाचा शहर व परिसरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये मंगळवारी (दि. ३०) होणारा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.
ठळक मुद्देप्रशिक्षणार्थींचा हिरमोड : औपचारिक सोहळ्यात घेणार शपथ