सिन्नर : अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या सांगतासमारंभानिमित्त जिल्हास्तरीय श्रीमंत भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होते. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, सुरेश पाटील, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आबासाहेब कोठावदे, नगराध्यक्ष किरण डगळे, माणिक बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, युवा नेते उदय सांगळे, त्र्यंबक गायकवाड, अश्विनी वारुंगसे, पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारुंगसे आदींसह पुरस्कारार्थी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्ह्याच्या सहकाराचे शुद्धीकरण करा : लहवितकरजिल्ह्यातील नेत्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली असून, त्याचे सहकारमंत्र्यांनी शुद्धीकरण करावे, अशी अपेक्षा महंत रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी व्यक्त केली. एकेकाळी नाशिक जिल्हा सहकार क्षेत्रात अग्रेसर होते; मात्र आता वाईट अवस्था आल्याचे ते म्हणाले. पेशवे पतसंस्थेच्या वतीने देशमुख यांच्या हस्ते राजकारण व समाज-कारणात उल्लेखनीय काम केल्याबद्दल माजी राज्य मंत्री तुकाराम दिघोळे, शैक्षणिक क्षेत्रासाठी नीलिमा पवार, तर संतसाहित्य क्षेत्रासाठी महंत महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना ‘श्रीमंत भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सहकार समृद्ध होणे गरजेचे : सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:14 AM