नाशिक : धुळे, जळगाव व नंदुरबार येथील आदिवासी बांधवांच्या वनहक्क जमिनींच्या दाव्यांबाबत तत्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी (दि.११) सकाळी ११ वाजेपासून लोक संघर्ष मोर्चाच्या आदिवासी महिलांनी आदिवासी विकास आयुक्तालयात आयुक्त डॉ.संजीव कुमार यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरू होते. लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने याआधी ११ व १२ जून रोजी सलग दोन दिवस आदिवासी बांधवांच्या प्रश्नावर आदिवासी विकास आयुक्तालयाला असेच घेराव आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर गुरूवारी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने गुरूवारी सकाळी ११ वाजता आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या कक्षात जाऊन त्यांना घेराव घालत आंदोलनास सुरूवात करण्यात आली. डॉ. संजीवकुमार यांच्या टेबलावरच जुन्या नस्त्यांचे (फाईलींचे)ढीग आंदोलनकर्त्यांनी निर्णय होत नसल्याचे कारण देत ठेवले. कोणत्याही परिस्थितीत लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही,असा इशारा यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. वन हक्क कायद्यातर्गंत वैयक्तिक व सामुहिक वन हक्कांचे दावे तत्काळ निकाली काढावेत, देहली प्रकल्पामुळे विस्थापीत होणाऱ्या आंबाबारीतील प्रकल्पग्रस्तांचे विकसनशील पूनर्वसन व आर्थिक उन्नतीचे कार्यक्रम राबविण्यात यावे, केंद्रीय विकास योजना व न्युक्लीअस बजेटच्या योजनांमधील अनियमितता शोधणे व त्यावर उपाय सुचवणे दोषींवर कार्यवाही करणे याहस काही प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी लोक संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी प्रतिभा शिंदे, रामदास तडवी, कथा वसावे, छिला वसावे, सुमित्रा वसावे, प्रकाश पारधी, पंडीत पाडवी,जग्गनाथ सोनवणे यांच्यासह आंदोलनकर्त्या आदिवासी बांधवांनी केली. सायंकाळी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्'ातील आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. (प्रतिनिधी)
लोक संघर्ष मोर्चाचा आदिवासी आयुक्तांना घेराव
By admin | Published: December 12, 2014 1:30 AM