पंचवटी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सूनने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक ओले झाल्याने त्याचा परिणाम विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर झाला आहे. बाजार समितीत शनिवारी (दि. २५) कोथिंबीरची आवक कमी आल्याने बाजारभावाने शंभरी गाठली. शनिवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीरला शंभर रुपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याने यंदाच्या वर्षातील हा सर्वाधिक बाजारभाव असल्याचे बाजार समितीचे संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. कळवण तालुक्यातील कनाशीचे शेतकरी सुभाष पवार यांनी आणलेल्या कोथिंबीरला दहा हजार रुपये शेकडा असा बाजारभाव मिळाला. सध्या सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने त्याचा परिणाम शेतमालावर होऊ लागला असून, आवक घटत आहे. पावसाने हजेरी लावण्यापूर्वी आवक घटल्याने कोथिंबीरला ६५ ते ७५ रुपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळत होता. चार वर्षांपूर्वी कोथिंबीरने पाच अंकी बाजारभाव गाठला होता. दरम्यान, कोथिंबीरपाठोपाठ कांदापात पन्नास रुपये, तर मेथी ३८ व शेपूची चाळीस रुपयेप्रतिजुडी दराने विक्री झाली. व्यापारी पराड यांनी प्रतिजुडी शंभर रुपये या बाजारभावाने कोथिंबीर खरेदी केली. (वार्ताहर)
कोथिंबीर @100
By admin | Published: June 26, 2016 12:37 AM