नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे ग्रामपंचायातीच्या वतीने कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कोविड १९ बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या जनजागृती फेरीत सरपंच शालिनी दौंड, उपसरपंच दत्ता दिघोळे, सदस्य ताईबाई गायकवाड, लता मोहिते, ग्रामसेवक आर.टी. सांगळे, पोलीस पाटील भिकाजी गीते, तलाठी राहुल देशमुख, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. गावातील प्रत्येक गल्लीतून ही फेरी काढून ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर, हात धुणे आदी बाबींचे महत्त्व सांगितले. यावेळी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने व सर्व ग्रामस्थांनी पुढील काही दिवस पुन्हा सावधगिरी बाळगून स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे उपस्थितीतांनी सांगितले. येत्या काळात गावात कडक निर्बंध लावण्याचा विचार ग्रामपंचायत विचार करत असल्याचे दौंड व दिघोळे यांनी सांगितले.
जायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 9:25 PM